|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुर्ली प्रकल्पाच्या चराच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

कुर्ली प्रकल्पाच्या चराच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह 

शवविच्छेदनाला विलंब केल्याने लोरे ग्रामस्थ आक्रमक

प्रतिनिधी / वैभववाडी:

कुर्ली घोणसरी देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या रावजी चराच्या पाण्यात लोरे नं. 2 संकपाळवाडी येथील दीपक ज्ञानू संकपाळ (45) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, मृतदेहाचे विच्छेदन करण्यास विलंब झाल्याने वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणून हल्लाबोल केला.

दीपक याला दारूचे व्यसन होते. त्यात त्याला अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. दारू पिऊन येताना चराच्या पाण्यात आंघोळ करण्याची त्याला सवय होती, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. सुमारास तो दारू अड्डय़ावर जात असताना अनेकांनी पाहिले होते. मात्र, त्यानंतर तो घरी आलाच नाही. दारू पिऊन कुठेतरी राहिला असेल, असा तर्क करून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

शनिवारी सकाळी 7.30 वा. च्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांना दीपकचा मृतदेह पाण्यात आढळला. याबाबत गणपत केशव संकपाळ यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी मृतदेहानजिक चराच्या बाजूला काही पैसे व दीपक यांचे चप्पल आढळून आले. कदाचित नेहमीप्रमाणे दीपक आंघोळीसाठी चराच्या पाण्यात उतरला असेल व आंघोळ करताना ह्य्दयविकाराचा झटका आल्याने त्याताच त्यांचा मृत्यू झाला असेल अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधला. मात्र, तीन तास होऊनही डॉक्टर उपलब्ध झाले नसल्याने सभापती लक्ष्मण रावराणे व स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मे यांनी कटर (सफाईगार) नसल्याने कणकवली येथून सफाईगार आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येईल, असे सांगितले. यावर सभापतींनी आक्रमक होत जिवंत माणसांवर सरळ उपचार करता येत नाहीत. निदान मयत व्यक्तीवर वेळेत अंत्यविधी होतील याची काळजी घ्या, असे सुनावले. यावर डॉ. धर्मे यांनी कटर येत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. शिवाय कणकवली रुग्णालयातील कटर (सफाईगार) याला बोलविण्यात आले आहे. तो येईपर्यंत थांबावेच लागेल, असे स्पष्ट केले.

शवविच्छेदनासाठी मृतदेहाची हेळसांड होत असल्याबाबत सभापती रावराणे यांनी हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. सायंकाळी तीन वा. च्या सुमारास शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दीपक यांच्या पश्चात आई, बहीण, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.