|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुमारस्वामीमुळे कळसा-भांडुराचे काम जोरात सुरु होण्याची भीती

कुमारस्वामीमुळे कळसा-भांडुराचे काम जोरात सुरु होण्याची भीती 

प्रतिनिधी/ वाळपई

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी कुमारस्वामी आल्यामुळे म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाला पुन्हा जोर येण्याची शक्यता असून कालव्यासह धरणाचेही बांधकाम पुन्हा एकदा जोरात सुरु होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्हादई बचाव आंदोलन तसेच अन्य समविचारी नागरिकांनी याबाबत भीती व्यक्त करुन गोव्याने आता अधिक सावध राहण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

कळसा-भांडुरा प्रकल्पाचे प्रकरण सध्या म्हादई लवादाकडे असून त्यावर अंतिम सुनावणी येत्या काही दिवसात अपेक्षीत आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व जनता दल आघाडीने सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांनी नुकतीच शपथ घेऊन पदभारही स्वीकारला आहे.

पायाभरणी कुमारस्वामीनीच केली होती

प्रकल्पाचे बांधकाम पुन्हा जोरात सुरु होण्याची भीती व्यक्त होत आहे, तिचे कारण म्हणजे या प्रकल्पाची पायाभरणी कुमारस्वामी यांनी यापुर्वी मुख्यमंत्री असताना केली होती. प्रकल्पाचे भूमीपूजनही त्यांच्याच हस्ते झाले होते. आता पुन्हा ते मुख्यमंत्री बनल्याने आपल्या कारकीर्दीतील या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी ते प्रयत्न करतील, याची शक्यता नाकारात येत नाही.

कुमारस्वामीनी कायम केला पाठपुरावा

काँग्रेस सरकारच्या काळात ते सरकारात नसले तरी कळसा-भांडुरा धरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढत होते. सदर भागाला भेट देऊन हा प्रकल्प लवकर व्हावा अशी मागणी वारंवार करत होते. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारवर दबाव आणण्याकरीता वेगळय़ावेगळय़ा प्रकारचे उपक्रम हाती घेतले होते. एकंदरीत या प्रकल्पाबाबत कुमारस्वामी यांना विशेष आस्था असल्याचे यापुर्वीपासून स्पष्ट झालेले आहे.

बांधकामाला जोर येण्याची शक्यता : केरकर

म्हादई बचाव आंदोलनाचे सचिव राजेंद्र केरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या बांधकामाला जोर येण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. कारण कुमारस्वामी यांच्याच कारकीर्दीत सदर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. आता तेच मुख्यमंत्री बनल्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते पुरेपूर खटपट करणार अशी शक्यता आहे. आतापर्यंत कर्नाटकी सरकारने आडमार्गाने सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळय़ा स्तरावर खटाटोप केला असून त्यांच्या स्वभावाची पार्श्वभूमी पाहता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा खटाटोप कुमारस्वामी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही केरकर म्हणाले.