|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी

मनपा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी 

प्रतिनिधी/ सांगली

राज्यात सत्तेत असणारा भाजपा मनपात निवडून येण्यासाठी शहरातील मतदारांना भेटवस्तू वाटणार आहे. या सरकारबद्दल जनतेची मानसिकता आता बदलत असून जनतेची भाजपाला फार मदत होणार नाही. शहरात विकासकामे करुन पुढे नेण्याची पक्षाची भूमिका असून महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिले.

सावंत प्लॉट येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन आ. जयंत पाटील आणि खा. वंदना चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. जयंत पाटील म्हणाले, सध्या निवडणुकीत अफाट खर्च करण्याची पध्दत आली आहे. यामुळे चांगले नेते मागे पडत आहेत. भाजपामधील नेते भेटवस्तू वाटणार असल्याचे खुलेआम सांगत आहेत. त्यामुळे या पक्षाकडे एवढा पैसा कोठून आला असा प्रश्न जनतेला पडत आहे. राष्ट्रवादी शहराबाबत पक्षाची भूमिका सांगण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचणार आहे. या निवडणुकीत भाजपाला जनतेची मदत होण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढणार असून जनतेने या आघाडीला मोठी मदत करावी.

नागरिकांच्या विरंगुळय़ासाठी विनाबांधकाम उद्याने असावीत अशी आमची भूमिका होती. वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रासोबत इलेक्ट्रिक गाडीचा प्रकल्प उभारला आहे त्या धर्तीवर सांगलीतही अशा योजना राबविण्यात येणार आहे. ज्येष्ठांना या केंद्रात येण्यासाठी दोन इलेक्ट्रिक गाडय़ांची सोय करणार आहोत. शहरात मूलभूत गरजांसोबत मनोरंजनात्मक उपाययोजना हव्यात. नागरिकांनी आमच्या उमेदवारांना जास्तीत जास्त काम करण्याची संधी निर्माण करुन द्यावी. सध्याच्या सरकारचे सांगली फेवरेट शहर नसल्याने या शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही. हे शहर अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी शहरात विविध योजना राबविण्यात येणार आहेत. खासदार ऍड. वंदना चव्हाण म्हणाल्या, काँक्रीटच्या शहरात पर्यावरणाची जपणूक आवश्यक आहे. महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनात्मक संधी निर्माण करुन दयाव्यात. स्मार्ट सिटी योजना फसवी असून शहरातील काही विशिष्ट भागातच ती राबविण्यात येत आहे. त्यापेक्षा शहर आरोग्यदायी बनवा. महापालिका निवडणुकीत मतदारांनी चार उमेदवारांच्या पूर्ण पॅनेलला निवडून द्यावे. शहरातील वाढते प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रयत्न करणार असून महिलांसाठी वूमन सेफ्टी पॉलिसी राबविण्याचाही विचार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन तसेच परिसरात डस्टबिन वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सुरेश पाटील, बन्सीलाल कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा वसुधा कुंभार यांनी केले. नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार विजय कडणे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गटनेते किशोर जामदार, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी शिक्षण सभापती पद्माकर जगदाळे, माजी विधानसभाक्षेत्र अध्यक्ष श्रीनिवास पाटील, मागासवर्गीस समितीच्या सभापती स्नेहल सावंत, सागर घोडके, नगरसेविका अंजना कुंडले, धनंजय कुंडले, रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.