|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » बोक्या सातबंडे परत आलाय…

बोक्या सातबंडे परत आलाय… 

प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणारं कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात बोक्या सातबंडे या 90च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार आहेत. आगामी कथेत बोक्या हा त्याच्या आजीच्या वर्गमित्राशी मैत्री करून त्यांचा प्रॉब्लेम दूर करणार आहे.

बोक्या त्याच्या सोसायटीच्या आवारात एका आजोबांना बघतो आणि त्याला आढळून येते की आजोबा त्यांचा बराचसा वेळ बाहेरच घालवतात. घरी बसण्याऐवजी बिल्डींगच्या खालीच बसलेले असतात. त्यानंतर बोक्या शोधून काढतो की आजोबा त्यांच्या भाची सोबत रहात आहेत आणि ते त्यांना त्रास देऊ इच्छित नाहीत म्हणून ते घराच्या बाहेर राहत आहेत. काही दिवसांची मैत्री झाल्यावर बोक्याला कळते की ते त्याच्या आजीचे वर्गमित्र आहेत. आजोबा त्याला त्यांच्या शाळेच्या दिवसातील आजीच्या गंमतीदार आठवणी सांगतात. बोक्या त्यानंतर घरी जाऊन त्याच्या आजीला त्या गंमतीजंमतींवरून चिडवतो देखील. त्याच्या आजीला आनंद होतो की तिच्या शाळेतील मित्र तिच्या घराजवळच राहात आहे तर दुसरीकडे त्यांच्या अडचणी पाहून ती अस्वस्थही होते. बोक्या त्याच्या आजी सोबत आजोबांना भेटायला जातो आणि तेव्हा त्यांना कळतं की एकेकाळी शिक्षक असलेले आणि घरून बऱयापैकी सधन असलेल्या आजोबांकडे काहीच राहिलं नाही आणि म्हणून त्यांना भाचीच्या उपकारांवर जगावं लागत आहे. एकेकाळी त्यांना एवढा मान मिळत होता आणि आता त्यांना घरचे सुद्धा विचारत नाहीत. ही गोष्ट बोक्याला अस्वस्थ करते. नेहमीप्रमाणे तो स्वत:चं डोकं चालवतो. बोक्याचा दादा एका प्रसिद्ध आणि विजेत्या कुस्तीगीराची मुलाखत घेणार असतो. बोक्या दादाला विनंती करतो आणि त्याचं एक काम करायला सांगतो. ती मुलाखत पेपरात छापून येते, टीव्ही वर दाखवली जाते. आणि राधे आजोबांचं नशीब बदलतं. त्यांच्या घरचे अचानक त्यांना महत्व देतात, त्यांचं कौतुक करतात आणि त्यांना घरीच थांबवतात.

बोक्या अशी कुठली युक्ती लढवतो की आजोबांचे दिवस पलटतात? जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल. ‘गुलमोहर’ सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वाजता झी युवा वर प्रसारित होते.