|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रीन रिफायनरीविरोधात प्रचंड मोर्चा

ग्रीन रिफायनरीविरोधात प्रचंड मोर्चा 

रामेश्वर, गिर्ये, नाणार परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग : जोरदार घोषणाबाजी

वार्ताहर / देवगड:

कोकणातील शेतकरी, मच्छीमार व सामान्य जनतेला नको असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प माथी मारण्याचे काम शासन करीत आहे. देवगड तालुक्यातील गिर्ये, रामेश्वर या दोन गावांबरोबरच आता अजून पंधरा गावे या प्रकल्पाला आवश्यक असणाऱया धरणासाठी हस्तांतरित करण्याचा डाव आखला जात आहे. आजचा मोर्चा हा शांततेमध्ये काढण्यात आला आहे. यापुढे रिफायनरी प्रकल्पासाठी शासनाने पाऊल उचलले, तर त्याला उत्तर हे आमच्या स्टाईलने असेल, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आमदार राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शेकडो शेतकऱयांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्वाभिमान पक्षाचे कार्यालय ते देवगड तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये रामेश्वर, गिर्ये व नाणार परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे एक तास मोर्चा सुरू होता. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ. अमोल तेली, स्वाभिमानचे जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश राणे, रामेश्वर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष मुनाफ ठाकूर, मच्छीमार नेते माजीद भाटकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, आरिफ बगदादी, ऍड. अविनाश माणगावकर, पंचायत समिती सदस्य सौ. शुभा कदम, लक्ष्मण पाळेकर, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, एकता मंचच्या अध्यक्ष सोनाली ठुकरुल आदी उपस्थित होते.

ग्रीन रिफायनरीचे पाप खासदार राऊतांचे 

राणे यांनी शासनावर तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणण्याचे पाप हे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. खासदार  राऊत यांनीच हा प्रकल्प नाणारमध्ये व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतली. जनतेचा विरोध वाढू लागल्यावर हेच खासदार मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प रद्द केला नाही, तर हक्कभंग आणणार, असे सांगत होते. आतापर्यंत खासदारांनी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग का आणला नाही, याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारला आले. नाणार प्रकल्प जाणार, अशी घोषणा करीत स्वतःच ते नाणारमधून गेले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या वयाचा विचार करून तरी चांगले काम करावे. सभेमध्ये येथील जनतेला अधिसूचना रद्द केली म्हणून खोटे सांगितले. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेबाबत विचारल्यावर उद्योगमंत्री नरमाईची भूमिका घेतात. यावरून प्रकल्पाचे पाप हे शिवसेनेचे आहे, असा घणाघात राणे यांनी केला.

अजून पंधरा गावांना विस्थापित करण्याचे शासनाचे षडयंत्र

देवगड तालुक्यातील गिर्ये व रामेश्वर या गावांना रिफायनरी प्रकल्पामध्ये घेण्यात आले आहे. आता या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱया धरणासाठी पंधरा गावे गिळंकृत करण्याचा डाव शासन आखित असल्याची माहिती प्राप्त होत आहे. गिर्ये व रामेश्वर येथील जनतेला विस्थापित करण्याचे पाप शिवसेनेने केले आहे. आता येथील मच्छीमार, आंबा बागायतदार, शेतकरी यांना पूर्णतः नेस्तनाबूत करण्याचा डाव शासन आखत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

बळाचा वापर झाल्यास पहिला सामोरे जाणार

प्रकल्पाबाबत अनेक निवेदने येथील जनतेने दिली आहेत. तरीही हा प्रकल्प रद्द करण्याबाबत शासन कोणतेही पाऊल उचलत नाही. आता प्रशासनाला हा शेवटचा इशारा आहे. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला आहे. यापुढील मोर्चा किंवा आंदोलन असोत, आमची भूमिका तीव्र राहणार आहे. शासनाने बळाचा वापर करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, तर पहिला सामोरा मी जाणार आहे. एक इंचही जमीन आता या प्रकल्पाला दिली जाणार नाही. शासनाच्या एका तरी अधिकाऱयाने हिंमत असेल, तर येथील जमिनीवर पाय ठेवून दाखवावा. जठार, खासदार राऊत यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी पत्रकार परिषद देवगड किंवा गिर्ये-रामेश्वर येथे घेऊन दाखवावी, असा इशाराही राणे यांनी दिला. देवगड तहसीलदार वनिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रामेश्वर संघर्ष समितीचे अध्यक्ष केळकर म्हणाले, 70 टक्के जनतेचा प्रकल्पाला विरोध असेल, तर कायद्याने हा प्रकल्प रद्द होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना 76 टक्के विरोध आहे हे निदर्शनास आणून दिले. तरीही प्रकल्प रद्द केला जात नाही. आमदार  राणे म्हणाले, जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरी प्रकल्पामध्ये अंतर खूप कमी आहे. नियमात हा प्रकल्प होऊ शकत नाही. एखाद्या प्रकल्पात तांत्रिक बिघाडा होऊन घटना घडली, तर येथील सगळेच नष्ट होईल. भाटकर यांनीही विचार मांडले.

महामार्गावर वाहतूक कोंडी

दरम्यान शुक्रवारी देवगडचा आठवडा बाजार असल्यामुळे वाहतूक मोठय़ा प्रमाणात होती. त्यातच एस. टी. महामंडळाचा संप असल्यामुळे खासगी वाहतूक जास्त होती. मोर्चाच्यावेळी देवगड-निपाणी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. देवगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच खासदार राऊत, जठार यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घेषणा देण्यात आल्या.