|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पेट्रोल कमी दराने देत मनसे करणार निषेध

पेट्रोल कमी दराने देत मनसे करणार निषेध 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिनी उपक्रम

संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांची माहिती

14 रोजी जन्माला येणाऱया मुलींसाठी ‘एफडी’

प्रतिनिधी /रत्नागिरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिनी रत्नागिरीत विविध समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केला. यादिवशी पेट्रोल दरवाढीचा शासनाचा निषेध म्हणून रत्नागिरीतील टीआरपी येथील एचपी पेट्रोलपंपावर 4 रुपये कमी दराने दिवसभर वाहनधारकांना पेट्रोल देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्ताने रत्नागिरीत मनसे पुन्हा एका नव्या जोमाने समाजपयोगी उपक्रम हाती घेत सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी संघटनेने आतापासूनच नियोजन हाती घेतले आहे. शासनाने पेट्रोल दरवाढ करून वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईचा निषेध म्हणून यादिवशी कोकणातील 30 ते 40 पेट्रोलपंपावर 4 रुपये कमी दराने स्वस्त पेट्रोल मनसेतर्फे दुचाकी व रिक्षाधारकांना दिले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरीतील टीआरपी येथील एचपी पेट्रोलपंपावरही ही सुविधा दिली जाणार आहे. 14 जून रोजी येथे सुमारे 3 ते 4 हजार लिटरचे वितरण कमी दराने केले जाणार आहे. त्यावेळी रिक्षाधारकाला 3 लिटरपर्यंत पेट्रोल या कमी दराने दिले जाणार आहे. हे पेट्रोल नियमित दरापेक्षा 4 रुपये कमी दराने देण्यामागे पेट्रोलदरवाढीचा निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे मनोज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदाळकर, सुनील साळवी, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

14 रोजी जन्माला येणाऱया मुलीच्या नावाने ‘एफडी’ काढणार

राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 रोजी साजरा करत असताना यादिवशी रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱया मुलींसाठी अभिनव योजना आखली आहे. जन्माला येणाऱया मुलींसाठी मनसेतर्फे 3 ते 4 हजार रुपयांची ‘एफडी’ काढली जाणार असल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरीत ‘फर्जंद’ सिनेमा दाखवणार

नुकताच छ.शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारा ‘फर्जंद’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा रत्नागिरीतही 14 रोजी मोफत दाखवला जाणार आहे. महाविद्यालयीन युवक, विद्यार्थी, नागरिक यांच्यासाठी दुपारी 12 वाजण्याचा शो आयोजित केला असल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरीतील अनधिकृत फेरीवाल्यांसाठी 15 दिवसांची मुदत

रत्नागिरी शहरातही मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढलेला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्या बाबत न. प. मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा अन्यथा त्यांना हटवण्याची गाठ आमच्याशी राहिल, असाही इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

खेडमध्ये उद्या पेट्रोल
मिळणार 4 रूपये कमी दराने!

खेडः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी 50वा वाढदिवस येथील मनसेच्यावतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी भरणे येथील मेहता पेट्रोल पंपावर सर्व दुचाकीधारकांना पेट्रोल 4 रूपये कमी दराने वितरण केले जाणार असल्याची माहिती विभागीय संघटक तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

येथील मनसेकडून गेली 12 वर्षे राज ठाकरे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रम राबवून धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदाच्या 50व्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त खेडवासियांना अनोखी भेट देण्यासाठी हा आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत भरणेतील मेहता पेट्रोल पंपावर सर्व दुचाकीस्वारांना पेट्रोल 4 रूपये कमी दराने वितरित केले जाणार आहे. तसेच सकाळी 8 वा. खांबतळे येथील शिवमंदिरात राज ठाकरे यांच्या निरोगी दीर्घायुष्य लाभावे, यासाठी अभिषेक करून 50 किलो पेढे वाटण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शहर महिला मनसेतर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

Related posts: