|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राष्ट्रवादीला पुन्हा पराभवाचा धक्का

राष्ट्रवादीला पुन्हा पराभवाचा धक्का 

विधान परिषद निवडणुकीत सुरेश धस विजयी

नाशिक पाठोपाठ उस्मानाबाद-बीड-लातूर गमावले

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी मारली बाजी

मुंबई / प्रतिनिधी

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेस आघाडीकडे मताधिक्क्य असतानाही राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना भाजप उमेदवार सुरेश धस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील संख्याबळ आणखी  घसरले आहे.

अपात्र नगरसेवकांच्या मतदानावरून उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघाच्या निवडणुकीचा वाद न्यायालयात गेला होता. त्यामुळे 21 मे रोजी मतदान होऊनही या मतदारसंघाची मतमोजणी हाती घेण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी तब्बल 22 दिवसांनी उस्मानाबाद-बीड-लातूरची मतमोजणी झाली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे येथील निवडणूक निकालाकडे सर्वांचे डोळे लागले होते.

मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीत माजी राज्यमंत्री सुरेश धस हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. मतमोजणीवेळी सांकेतिक आकडे लिहिलेल्या 25 मतपत्रिका आढळून आल्या. या मतपत्रिकांवरून धस आणि जगदाळे यांच्यात काही काळ वाद झाला. निवडणूक निर्णय अधिकारी रामकृष्ण गमे यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवून वादग्रस्त मतपत्रिका बाद ठरवल्या. मतमोजणीत सुरेश धस यांना जगदाळे यांच्यापेक्षा 76 मते अधिक मिळाली. काँग्रेस आघाडीकडे 1005 पैकी 527 मते असतानाही भाजपने पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीला दणका दिला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय गणित चुकले. राजकारणात जनतेशी खेळू नये. राष्ट्रवादीला अपरिपक्व राजकारण आणि अतिआत्मविश्वास नडला, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी भाजपच्या विजयानंतर दिली.

उस्मानाबाद-बीड-लातूरचा निकाल

सुरेश धस (भाजप)…………..526

अशोक जगदाळे (अपक्ष)………451

बाद मतांची संख्या……………….25

Related posts: