|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हॉटेल व्यवसाय परवाना नूतनीकरणाला प्रतिसाद

हॉटेल व्यवसाय परवाना नूतनीकरणाला प्रतिसाद 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टीकचा वापर टाळावा. त्याचप्रमाणे व्यवसाय परवाना घेऊन व्यवसाय करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कृष्टगौड तायण्णावर यांनी केले. एकखिडकी योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त व्यावसायिकांनी परवाने नूतनीकरण आणि नवीन परवाना घेण्याचे सांगितले.

बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशन आणि महापालिकेच्यावतीने हॉटेल चालकांचे व्यवसाय परवाने नूतनीकरणासाठी मंगळवारी टिळक चौक येथे एकखिडकी सुविधा उपलब्ध केली होती. हॉटेल चालकांचे व्यवसाय परवाने करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. शहरात असंख्य हॉटेल व्यवसायिक आहेत. मात्र बहुतांश व्यावसायिकांच्या व्यवसाय परवान्याची मुदत संपुष्टात आली आहे. यामुळे परवान्याचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेदहा पासून सायंकाळी पाच वाजेपर्यत एकखिडकी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

व्यवसाय परवाने काढण्यासाठी महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर चलन देण्यात येते. चलनाची रक्कम भरल्यानंतर परवाना दिला जातो. याकरिता व्यवसाय परवाना नूतनीकरणासाठी व्यवसायिकांना व्यवसाय बंद ठेवून धावपळ करावी लागते. यामुळे एकाच ठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी 50 हून अधिक व्यावसायिकांनी अर्ज केले. अर्जदारांच्या अर्जाची छाननी करून व्यवसाय परवाने नूतनीकरण करण्यात आले. बुधवार दि.13 रोजी एकखिडकी उपक्रम सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन  महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.शशीधर नाडगौडा यांनी केले.

शहरात हातगाडीवरील कॅन्टीन चालविण्यात येतात. पण त्यांना कोणतीच शिस्त नसल्याने स्वच्छता ठेवली जात नाही. यामुळे हातगाडीवर व्यवसाय करणाऱयांना शिस्त लावण्यासाठी कचरा टाकण्यासह स्वच्छता ठेवण्याबाबची सुचना देण्यात यावी अशी सुचना करण्याची विनंती असोसिएशनच्यावतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आली. याप्रसंगी उपक्रमाचा शुभारंभ महापौर बसाप्पा चिकलदिन्नी, महापालिका आयुक्त कृष्टगौड तायण्णावर, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विजय सालीयन,उपाध्यक्ष गिरीश पै, संघटनेचे सचिव चंद्रशेखर शेट्टी, खजिनदार उल्हास शानभाग, दिलशाद सौदागर, बाळकृष्ण पै, श्यामसुंदर राव आदीसह संघटनेचे सदस्य, महापालिकेचे क्लार्क सुरेश दयाण्णावर, स्वच्छता निरीक्षक बाबु माळण्णावर व कर्मचारी उपस्थित होते.

 

Related posts: