|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » शिखर धवनचे उपाहाराआधी शतक

शिखर धवनचे उपाहाराआधी शतक 

बेंगळूर :

शिखर धवन व मुरली विजय या सलामीवीरांनी झळकवलेल्या शतकांनी भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 347 धावा जमविल्या. धवनने उपाहाराआधीच शतक झळकावत असा पराक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला. कसोटी पर्दापण करणाऱया अफगाणला पहिल्या दोन सत्रात घाम गाळावा लागला असला तरी अखेरच्या सत्रात मुसंडी मारून वर्चस्व मिळविले आणि भारताला 1 बाद 280 वरून 6 बाद 347 धावांवर रोखले.

धवनने अफगाणच्या नवख्या गोलंदाजांवर तुटून पडत 96 चेंडूत 107 धावा तडकावल्या तर सावध सुरुवात केल्यानंतर त्याचा जोडीदार मुरली विजयनेही नंतर फटकेबाजी करीत 153 चेंडूत 15 चौकार, एक षटकारासह 105 धावा जमविल्या. त्याचे हे 12 वे कसोटी शतक आहे. या दोघांनी 28.4 षटकांत 168 धावांची भक्कम सलामी दिली. मात्र शेवटच्या सत्रात भारताची पकड थोडी सैल झाली आणि या सत्रातील 32 षटकांत 5 बळी देत केवळ 99 धावा जमविल्या. पहिल्या दोन सत्रातील स्थिती पाहता पहिली कसोटी असूनही अफगाणने पहिल्या दिवशी बऱयापैकी कामगिरी केली असे म्हणावे लागेल. या सत्रात मुरली विजय व अर्धशतक नोंदवत स्थिरावलेला केएल राहुल यांना यामिन अहमदझाय व वफादार या वेगवान गोलंदाजांनी झटपट बाद केले विजय-राहुल यांनी दुसऱया गडय़ासाठी 139 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली. पण जोडी फुटल्यानंतर भारताची अल्पशी घसरगुंडी उडाली.

कर्णधार अजिंक्मय रहाणे (45 चेंडूत 10) व चेतेश्वर पुजारा (35) यांना सलामीवीरांचा ओघ कायम राखता आला नाही. यामुळे अफगाणच्या गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी मिळाली. मर्यादित षटकांतील क्रिकेटमध्ये अव्वल बनलेला स्पिनर रशिद खानने रहाणेच्या रूपात पहिला कसोटी बळी मिळविला तर मुजीब उर रेहमानने पुजाराला लेगगलीमध्ये झेलबाद केले. पुनरागमन करणारा दिनेश कार्तिकही (4) फारवेळ टिकला नाही. अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावचीत झाला. त्यामुळे सलामीवीरांनी करून दिलेली भक्कम सुरुवात मधल्या फळीने वाया घालविली.