|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रसिद्ध केसरव्हाळ झरीच्या खासगीकरणाला विरोध

प्रसिद्ध केसरव्हाळ झरीच्या खासगीकरणाला विरोध 

प्रतिनिधी/ वास्को

केसरव्हाळ कुठ्ठाळी येथील प्रसिद्ध केसरव्हाळ झर तेथील 28200 चौ. मी. जमिनीसह खासगी कंपनीला देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. केळशी पंचायत क्षेत्रात ही जमीन व झर येत असून गावातील व संबंध गोव्यातील लोकांचा या स्थळावर हक्क आहे. त्याचे खासगीकरण करू नये अशी मागणी करून पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल व स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केसरव्हाळ झर बचाव अभियानने केली आहे.

यासंबंधी अभियानने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गोवा पर्यटन विकास महामंडळाने केसरव्हाळची सदर जमीन एका खासगी आस्थापनाला बांधा, वापरा व परत करा या धर्तीवर देण्याचे प्रयत्न चालविले असून त्या जमिनीवर 35 खोल्यांचे तीन तारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. पारंपरिक झऱयाचा विकास करण्याच्या निमित्ताने हे करण्यात येत आहे. मात्र, केसरव्हाळ गावच्याच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील लोकांचा या निर्णयाला विरोध असल्याचे अभियानने म्हटले आहे.

केसरव्हाळची झर हा एक पारंपरिक ठेवा असून तिचे खासगीकरण करून गोव्यातील लोकांना तेथे जाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या झरीच्या पाण्याला औषधी गुणधर्म असून गोव्यातील लोकांच्या भावना या झरीशी जुळलेल्या आहेत. या झरीच्या वापरावर निर्बंध आल्यास लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल, तसेच येणाऱया प्रकल्पामुळे झरीच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल.

या पारंपरिक झरीवर लोकांचा हक्क असल्याने स्थानिक पंचायतीमार्फत तिचा विकास करण्याची गरज आहे. खासगीकरणातून विकास नको, असे स्पष्ट करून अभियानने 75 कोटी रूपये मुल्य असलेल्या 28200 चौ. मी. जमिनीत येणाऱया प्रकल्पाची कोणतीही माहिती जाहीर न करता व पर्यावरणीय परिणामांचा अहवाल तयार न करता थेट खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू करणे हा एक घोटाळा आहे, असा संशय अभियानने व्यक्त केला आहे.

स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अन्यथा स्थानिक लोकांनाच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील लोकांना झरीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा इशारा केसरव्हाळ झर बचाव अभियानने दिला आहे.