|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » डिसेंबरपर्यंत भारतमालासाठी निविदा

डिसेंबरपर्यंत भारतमालासाठी निविदा 

50 टक्के प्रकल्पांसाठी आयोजित करणार बोली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतमाला प्रकल्पातील पहिल्या फेरीतील निविदा प्रक्रियेला 2018 च्या अखेरपर्यंत सुरवात करण्यात येईल. पहिल्या सहा महिन्यांत 50 टक्के प्रकल्पांसाठी निविदा जारी करण्यात येईल असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

मंत्रालयाची दोन दिवसीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डिसेंबर 2018 पर्यंत 50 टक्के प्रकल्पांची निविदा जारी करत कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उभारण्यासाठी केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत 60 हजार किमीपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात येणार असून सरकारकडून 6.92 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतील. पहिल्या फेरीमध्ये 24,800 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 10 हजार किमी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पातून बांधण्यात येतील. 2017 ते 2022 दरम्यान कालावधीत 5.35 लाख कोटी रुपये पहिल्या फेरीदरम्यान खर्च करण्यात येतील.

मंत्रालयाच्या या बैठकीत 20 राज्यांतील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होणाऱया 300 प्रकल्पांचा निर्णय घेण्यात आला असून ते मार्च 2019 पर्यंत पूर्ण होतील. एनएचएआयच्या 427 आणि मंत्रालय, एनएचआयडीसीएलच्या 311 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षात साधारण 4 हजार किमी प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्या होता. चालू वर्षात एकूण 8 हजार किमीसाठी निविदा मागणविण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारी अधिकाऱयांनी सांगितले. गेल्या वर्षात 6 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात आले होते, तर यंदा डिसेंबरपर्यंत एक लाख कोटीच्या प्रकल्पांसाठी निविदा येतील असा मंत्रालयाला अंदाज आहे.

भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या फेरीत 26,200 किमीच्या आर्थिक कॉरिडॉरची निवड करण्यात आली असून 1.2 लाख कोटी रुपये खर्च करत 9 हजार किमीचा महामार्ग बांधण्यात येईल.