|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेख संस्थेचा आगळावेगळा जलसंचय प्रकल्प

शेख संस्थेचा आगळावेगळा जलसंचय प्रकल्प 

सुशांत कुरंगी / बेळगाव

पाणी हा आपल्या समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुष्काळामुळे आज अनेक गावे होरपळत आहेत. आपल्याकडून कळत न कळत झालेल्या पर्यावरणाच्या ऱहासामुळे पावसावर परिणाम होत आहे. पाणी हवे असेल तर मिळालेल्या पाण्याचे योग्य नियोजन व पुनर्वापर करणे गरजेचे आहे. हाच विचार करून बेळगाव येथील शेख शिक्षण समूहाने 40 लाख लीटर क्षमतेचे तळे बांधले आहे. विशेष म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे या पाण्याचा साठा होत असून वर्षभर त्याचा वापर होत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या शेख शिक्षण समूहाचे भुतरामहट्टी येथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. अबू शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था मार्गक्रमण करीत आहे. ते पर्यावरणपेमी असल्याने त्यांचे या क्षेत्रात अनेक प्रयोग सुरू असतात. त्यामुळेच त्यांनी वनविभागाच्या मदतीने 2 हजार 200 रोपांची लागवड केली आहे.

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना कंत्राटदाराला मातीची गरज भासली. सदर कंत्राटदाराने ही गोष्ट शेख शिक्षण समूहाचे चेअरमन अबू शेख यांना सांगितली. शेख यांच्या महामार्गालगत असणाऱया कॉलेजच्या एका कोपऱयातील माती खोदाई करून घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे कंत्राटदारालाही जवळच माती उपलब्ध झाली. या खड्डय़ातच आणखी खोदाई करून तळय़ाचे स्वरुप देण्यात आले.

40 लाख लीटर पाण्याची साठवण

150 फूट रुंद व 225 फूट लांब अशी या तलावाची रचना केली आहे. एका बाजूला 8 फूट खोल तर दुसऱया बाजूला 30 फूट खोल असे हे तळे आहे. यामध्ये 40 लाख लीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. भुतरामहट्टी येथील जमीन ही पाणी शोषून घेणारी असल्याने एचडीपीई 500 हा मायक्रॉन प्लास्टिक कागद घालण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभर पाण्याचा साठा होत असतो. दगडी बांधणीनंतर आता सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अंदाजे 25 लाख रुपये इतका खर्च आला आहे.

पावसाच्या पाण्याचा वापर

पावसाळय़ात पावसाचे पाणी वाहून जाते. याचा वापर करून घेण्यासाठी कॉलेजच्या सर्व बिल्डिंगवरील पाणी पाईपद्वारे एकत्रित करून ते तलावात सोडण्यात आले आहे. कॉलेजच्या बिल्डिंगपासून तळय़ापर्यंत पूर्णपणे पाईपलाईन करण्यात आली आहे. वाहून जाणाऱया पाण्याचा वापर करण्यात आला आहे.

पाण्याचा पुनर्वापर

या तळय़ातील पाणी फिल्टर करून कॉलेजच्या स्वच्छतागृहामध्ये पुनर्वापर करण्यात येतो. तसेच कॉलेज परिसरात 2200 झाडे लावण्यात आली असून या झाडांना वर्षभर याच पाण्याचा वापर करण्यात येत असतो. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होऊन पुनर्वापर करणे शक्य होत आहे.

बेळगाव भागातील सर्वात मोठे खासगी तळे

पर्यावरण संवर्धनाबरोबरच पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पावसाच्या पाण्याचा वापर करत हे तळे बनविण्यात आले आहे. या तळय़ात 40 लाख लीटर पाणी साठविण्याची क्षमता असल्याने हे बेळगाव परिसरातील सर्वात मोठे खासगी तळे असल्याचा दावा कॉलेजने केला आहे. या तळय़ामुळे लवकरच परिसरात लहान-मोठे पक्षी वास्तव्याला येऊन त्यांना नैसर्गिक अधिवास मिळणार आहे.

पर्यावरण संवर्धनाची जाणीव महत्त्वाची : डॉ. अबू शेख (चेअरमन, शेख शिक्षण समूह)

आपण पर्यावरणाकडून खूप काही घेत असतो. परंतु त्याच पर्यावरणाचे आपणही काही देणे लागतो, ही जाणीव जेव्हा सर्वांमध्ये होईल तेव्हाच पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यापेक्षा ते साठवून पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वर्षभर पाणी साठून राहते : प्रा. बसवराज माळी (पर्यावरण विभाग प्रमुख)

कॉलेजने पावसाच्या पाण्याचा वापर करून हे भव्य तळे उभारले आहे. ही जमीन पाणी शोषून घेत असल्याने एचडीपीई 500 मायक्रॉनचे प्लास्टिक वापरण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभर पाणी साठून राहते. या पाण्याचा वापर झाडांबरोबरच कॉलेजलाही होत असतो.

 

 

Related posts: