|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रिक्त पदांचा आकृतीबंध तात्काळ घोषित करा!

रिक्त पदांचा आकृतीबंध तात्काळ घोषित करा! 

शिक्षक सहविचार सभेत आमदार गाणार यांची मागणी

प्रतिनिधी / ओरोस:

राज्यात माध्यमिक शाळांतील, लिपीक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामे ठप्प आहेत. शिक्षण सेवक पदाच्या मान्यता मिळाल्या नाही. अनेक समस्या निर्माण होत आहेत. शिक्षक, संस्थाचालक यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासनाची गरज भासते. शासन उदासिन वाटते. शासनाने धोरणात्मक निर्णय करून कर्मचाऱयांचा आकृतीबंध घोषित करावा, अशी मागणी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी केली. ते ओरोस येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सहविचार सभा गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांसोबत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी चर्चा केली.

4 एप्रिल रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रलंबित प्रश्न चार आठवडय़ाच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे. शासनाचा शासन निर्णय त्वरित मुख्याध्यापकांना, त्या शाळांना कळविणे बंधनकारक आहे. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, नियुक्ती, न्यायालयीन प्रकरणे, पदोन्नती अशी 64 प्रकरणे प्रलंबित आहेत. नियमांना अधिन राहून मान्यता देणे या सर्व बाबींची शासनस्तरावर शिक्षणाधिकाऱयांनी त्वरित अंमलबजावणी करावी, असे लेखी आदेश शिक्षण आमदार गाणार यांनी दिले.

न्यायालयाचा आदेश असूनही काही शिक्षकांना हजर करून घेतले नाही. संच निर्धारित करताना सेवा ज्येष्ठता यादी चुकीची दाखवून समायोजन करताना ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यांची गांभिर्याने दखल घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मचाऱयांचे प्रश्न प्रलंबित ठेऊ नये. पेन्शन सर्वांना मिळायला हवी. त्यांचा तो हक्क आहे. अनुकंपा खालील प्रकरणे त्वरित मंजूर करावीत. काही शाळांतून दहा-दहा वर्षे विनावेतन कर्मचारी काम करीत आहे. भरती बंदीचे कारण सांगून मान्यता मिळत नाहीत. शासनस्तरावर याचा गांभिर्याने विचार होत नाही. शिक्षण क्षेत्रातील ही दुरावस्था भविष्यात घातक आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष घालून धोरणात्मक निर्णयाची अमंलबजावणी करावी. अंशदायी पेन्शन योजनेचा फेरविचार व्हावा. जे काम करतात त्यांना पेन्शनचा अधिकार आहेच. मग आमदार, खासदारांना पेन्शन वाढवून का दिली जाते?. असे विचार यावेळी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार गाणार यांनी सहविचार सभेत व्यक्त केले.

जिल्हय़ातील शिक्षकांचे प्रश्न वेळेत मार्गी लागले नाही तर येत्या 4 जुलैपासून सुरू होणाऱया पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडू, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारी राज्यव्यापी संघटना आहे. संघटनेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱयांची आहे, असे यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, जिल्हाध्यक्ष राजेंद्र माणगावकर, सचिव सलिम तकिलदार, वाय. पी. नाईक, डी. एस. ढगे, एस. के. राठोड, नंदन घोगळे, येडगे भीमराव, भरत केसरकर, सुभाष प्रभूखानोलकर, प्रवीण पारकर, सुनील जाधव, कैलास खरबडे, प्रकाश कुलकर्णी, प्रवीण सानप, एस. पी. कुलकर्णी, संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर, श्री. पारधी, विस्तार अधिकारी सौ. मांजरेकर, पाटील, मोरजकर, धामापूरकर, परब आदी कर्मचारी उपस्थित होते. आमदार गाणार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. आभार तकिलदार यांनी मानले.

Related posts: