|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चिंदरला तीन बंद बंगले फोडले

चिंदरला तीन बंद बंगले फोडले 

बंगले मालक मुंबईत वास्तव्याला

वार्ताहर / आचरा:

 आचरा-भगवंतगड मार्गावर चिंदर भटवाडी येथे असलेल्या 40 बंगल्यांपैकी रस्त्यालगत असणारे तीन बंद बंगले फोडल्याची घटना समोर आली आहे. बंगल्यांचे मालक मुंबईला वास्तव्यास असल्याने नक्की किती रकमेची आणि वस्तुंची चोरी झाली हे समजू शकले नाही. चिंदर भटवाडीत एकाच ठिकाणी चाळीस बंगले असून त्यांचे मालक मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यामुळे बंगल्यात कोणीही नसल्याची संधी साधत हे बंगले फोडण्यात आले. मात्र, या बंगल्यातील किंमती चीजवस्तुंना चोरटय़ांनी हात लावला नसल्याने रोख रक्कम चोरण्याच्या इराद्याने चोरटय़ांनी बंगले फोडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही चोरी मंगळवार ते शुक्रवारदरम्यान घडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. आचरा पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर तपास करत आहेत. आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  आचरा भगवंतगड मार्गावर चिंदर गावाच्या हद्दीत असलेल्या कॉलनीत सुमारे 40 बंगले आहेत. मात्र, या बंगल्यांचे मालक मुंबईला असल्याने बंद असतात. ही संधी साधत चोरटय़ांनी बंगले फोडले. यात जीवन पुळेकर, केतन मुणगेकर व सतीश गंगाधर आस्वलकर यांच्या बंगल्यांना चोरटय़ांनी लक्ष केले. कटावणीच्या सहाय्याने दरवाजांच्या कडय़ा तोडून चोरटय़ांनी प्रवेश केल्याचे दिसत होते. तिन्ही बंगले फोडण्याची पद्धत एकच होती. चोरटय़ांनी टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर व इतर चीजवस्तुंना हात न लावता घरातील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त फेकले होते. बंगले फोडल्याची बातमी समजताच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, सुनील चव्हाण, कैलास ढोले, अक्षय धेंडे, चिंदर उपसरपंच अनिल गावकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, ग्रामपंचायत कर्मचारी रणजीत दत्तदास, केअर टेकर विकास कुमठेकर आदी घटनास्थळी दाखल झाले. आचरा पोलिसांनी बंगल्यांच्या मालकांना फोनद्वारे चोरीची माहिती देत पंचयादी घातली.

बंगले फोडल्याचे आले निदर्शनास

 चिंदर भटवाडीतील कॉलनीतील सर्वच बंगले बंद असतात. मात्र, शनिवारी सकाळी त्याच कॉलनीतील गणेश चव्हाण हे मुंबईहून सकाळी गावी आले होते. ते आपल्या बंगल्यात शनिवारी सकाळी 8.30 वाजता उतरले होते. त्यावेळी त्यांच्या समोरच्या केतन मुणगेकर यांच्या बंगल्याचे दार उघडे होते. सायंकाळ होऊनही मुणगेकर यांच्या बंगल्यातील लाईट न लागल्याने चव्हाण यांनी मुणगेकर यांना फोनद्वारे संपर्क करीत बंगल्याचे दार उघडे असल्याचे सांगत चौकशी केली. त्यावर मुणगेकर यांनी आपण मुंबईतच आहोत, असे सांगत नक्की बंगल्यात कोण आहे, याची पाहणी करण्यास चव्हाण यांना सांगितले. चव्हाण यांनी पाहणी केली असता, बंगल्याच्या दाराची कडी तोडल्याचे दिसत होते. या घटनेची माहिती चव्हाण यांनी पोलीस पाटलांना दिली. बंगला फोडल्याचे वृत्त समजताच रविवारी सकाळीच इतर बंगल्यांच्या केअरटेकरनी पाहणी केली असता इतर दोन बंगलेही फोडल्याचे निष्पन्न झाले.

रोख रकमेसाठी चोरी झाल्याची शक्यता

  चिंदर भटवाडी कॉलनीत फोडण्यात आलेले बंगले हे भुरटय़ा चोरांनी फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. फोडण्यात आलेल्या बंगल्यातील टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर्स अशा वस्तुंना हात लावण्यात आला नव्हता. मात्र, घरातील बंद कपाटे उघडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या होत्या. चोरटय़ांनी रोख रक्कम चोरीच्या उद्देशाने बंगले फोडल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, बंगल्यांचे मालक हे मुंबईला असल्याने या चोरीत नक्की किती मुद्देमाल चोरीस गेला, हे समजू शकले नाही.