|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मयतांना प्रशिक्षण अन् सेवानिवृत्तांना प्रमोशन…!

मयतांना प्रशिक्षण अन् सेवानिवृत्तांना प्रमोशन…! 

संजय पवार/सांगली

मयत होवून काही वर्षाचा कालावधी उलटून गेला…. तर सेवानिवृत्त होवून काही महिन्याचा… पण, सरकारी गलथान कारभारामुळे मयत कर्मचाऱयांना प्रशिक्षण आणि सेवानिवृत्तींना प्रमोशन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. याची जिल्हय़ाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सर्वच शासकीय कार्यालयातून जोरदार चर्चा सुरू आहे.

आपला देश आणि राज्य कृषी प्रधान म्हणून ओळखले जात असले तरी, सध्या सर्वात रिक्त जागा असलेले शासकीय कार्यालय म्हणून राज्य शासनाचा कृषी विभागाचा पहिला नंबर लागतो. सध्या या कार्यालयाकडे 40 टक्क्याहून अधिक जागा रिक्त आहेत. जिल्हय़ातील तालुका कृषी कार्यालयातील कारभार तर प्रभारी अधिकाऱयांवरच अवलंबून आहे. मयत झालेल्या कर्मचाऱयांना प्रशिक्षणांच्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना प्रमोशनच्या नोटिसा काढून या कृषी विभागाचा कारभार किती रामभरोसे सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

कुंडल येथील प्रशिक्षण केंद्रात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांना 21 ते 24 जून अखेर प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या प्रशिक्षणासाठी जिल्हा कृषी विभागाकडील तीन कर्मचाऱयांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या तीन कर्मचाऱयांपैकी कोळी आणि गाडे नामक कर्मचाऱयांचाही समावेश होता. पण, हे दोन्ही कर्मचारी मयत होवून काही वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येवून त्यांच्या नांवे प्रशिक्षणाच्या नोटिसा काढण्यात आल्या असल्याची बाब उघड झाली आहे.

सध्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱयांची पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येत असून 31 मे 2018 रोजी सेवानिवृत्त झालेल्या काही कर्मचाऱयांचीही पदोन्नतीच्या यादीत नांवे असल्याचे उघड झाले आहे. महिन्यापूर्वी तासगांव तालुक्यातुन सेवानिवृत्त झालेल्या ‘पवार’ आणि ‘पाटील’ अशा दोन कृषी सहाय्यकांना पदोन्नती देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्हा कृषी कार्यालयाकडे माहिती मागविण्यात आल्याचेही समोर आले आहे.

सध्या जिल्हय़ाच्या कृषी विभाग अनेक कारणांनी कायमच चर्चेत राहिला आहे. खरीपाचा पेरणी हंगाम पावसाअभावी लांबणीवर पडला असला तरी, कृषी विभागाकडून देण्यात येणारी बियाणे अद्याप शेतकऱयांच्यापर्यत पोहोचली नाहीत. रिक्त पदांच्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱयांच्याकडे अनेक पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. शिवाय, गावपातळीवर कृषी सहाय्यकच जात नाहीत. कृषी विभागाबाबत अशा अनेक तक्रारी असतानाच ‘मयतांना प्रशिक्षण आणि सेवानिवृत्तांना प्रमोशन’ देवून या विभागाने आपला कारभार किती रामभरोसे सुरू आहे हे दाखवून दिले आहे.

कृषी विभागाच्या या रामभरोसे कारभाराची जिल्हय़ाच्या मध्यवर्ती कार्यालयात असलेल्या सर्वच कार्यालयातून खंमगपणे चर्चा सुरू आहे.