|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » रोमांचक विजयासह अर्जेन्टिना बाद फेरीत!

रोमांचक विजयासह अर्जेन्टिना बाद फेरीत! 

फिफा फुटबॉल विश्वचषक : संघर्षमय लढत देणाऱया नायजेरियाच्या पदरी अखेर निराशा

मॉस्को/ वृत्तसंस्था

स्टार खेळाडू लायोनेल मेस्सीसह रोजोने देखील गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतल्यानंतर अर्जेन्टिनाने रोमांचक विजयासह अतिशय नाटय़मयरित्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. नायजेरियाने या लढतीत शेवटच्या सत्रापर्यंत झुंजार लढत दिली. पण, रोजोने निर्धारित वेळेत अवघ्या 4 मिनिटांचा कालावधी बाकी असताना स्वप्नवत, निर्णायक गोल केला आणि इथेच हा सामना अर्जेन्टिनाच्या बाजूने झुकला!

अर्जेन्टिनाच्या सुपरस्टार लायोनेल मेस्सीने 14 व्या मिनिटाला या विश्वचषकातील आपला पहिला गोल नोंदवला, त्यावेळी चाहत्यांनी अवघे स्टेडियम जणू डोक्यावर घेतले. डी मारियाने आपल्या मार्करला चकवा दिल्यानंतर पेनल्टी एरियाच्या किंचीत बाहेर असलेल्या मेस्सीकडे पास दिला आणि मेस्सीने देखील ही संधी अजिबात दवडली नाही. त्याच्या फटक्यावर चेंडू गोलजाळय़ात जावून विसावला आणि इथेच मेस्सीच्या निराशाजनक कामगिरीला देखील पूर्णविराम लाभला.

बॉल पझेशनच्या आघाडीवर अर्जेन्टिनाने 65 टक्के तर नायजेरियाने केवळ 35 टक्के वर्चस्व गाजवले. पण, तरीही नायजेरियाने खऱया अर्थाने अर्जेन्टिनाला बरोबरीच्या खिंडीत पकडण्यासाठी अतिशय जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ती शेवटच्या क्षणी अपयशी ठरली.

प्रारंभी, 14 व्या मिनिटाला मेस्सीने संघाचे खाते उघडल्यानंतर नायजेरियातर्फे मोजेसने पेनल्टीवर 49 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला बरोबरी प्राप्त करुन दिली. अर्जेन्टिनाच्या मॅस्केरानोकडून बॅलोगनला पाडण्याची चूक झाल्यानंतर नायजेरियाला सदर पेनल्टी बहाल केली गेली होती. यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही संघांनी अतिशय रटाळ, बचावात्मक खेळावर भर दिला. नायजेरियाचे मिडफिल्डर्स देखील येथे प्राधान्याने बचावाच्या आघाडीवर खेळताना दिसून आले. एकाच वेळी अर्जेन्टिनाचे हल्ले परतावून लावण्यासाठी त्यांनी मेस्सीसारख्या खेळाडूंचे मार्किंग करण्यासाठी तब्बल 4-4 खेळाडू तैनात केले होते. अर्थात, 86 व्या मिनिटाला रोजोने सुवर्णसंधी साधत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि इथेच अर्जेन्टिनाचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला.

त्यानंतर उर्वरित 4 मिनिटे व 4 मिनिटांच्या इन्जुरी टाईममध्ये अर्जेन्टिनाने बचावात्मक खेळावर भर देणे पसंत केले. अगदी शेवटच्या क्षणी 15 सेकंदाचा जेमतेम वेळ बाकी असताना नायजेरियाने आक्रमक हल्ला केला होता. पण, फिनिशिंगच्या अभावी त्यांची ही संधी हुकली आणि अर्जेन्टिनावर पहिल्याच साखळी फेरीत गारद होण्याची नामुष्की टाळता आली.

अर्जेन्टिनाची उपउपांत्यपूर्व लढत फ्रान्सविरुद्ध!

आता या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेन्टिनाचा मुकाबला फ्रान्सविरुद्ध तर क्रोएशियाचा लढा डेन्मार्कविरुद्ध होईल. अर्जेन्टिना-फ्रान्स लढत शनिवारी तर क्रोएशिया-डेन्मार्क लढत रविवारी होईल. यंदा या विश्वचषकात पोर्तुगाल-उरुग्वे व स्पेन-रशिया यांच्यातील उपउपांत्यपूर्व लढती देखील यापूर्वीच निश्चित झाल्या आहेत.

गोलरक्षक अर्मानीचे स्वप्नवत पदार्पण

मागील लढतीत अक्षम्य चुका करणाऱया जियाला अर्जेन्टिनाने या लढतीत बाहेर बसवणे पसंत केले. येथे नायजेरियाविरुद्ध त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया अर्मानीला प्रथम पसंती दिली आणि तो देखील संघाचा विश्वास सार्थ ठरवण्यात यशस्वी झाला. अर्थात, एखाद्या विश्वचषक लढतीत आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळणारा पोर्तुगालच्या रुबेन अमोरिमनंतरचा पहिलाच खेळाडू ठरला. पोर्तुगालने त्याला 15 जून 2010 रोजी आयव्हरी कोस्टविरुद्ध विश्वचषक स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली होती.

Related posts: