|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » साथीच्या आजारांचे नेहमीच आव्हान

साथीच्या आजारांचे नेहमीच आव्हान 

परवा मुंबईत लेप्टोच्या आजाराने तिघांचा मृत्यू झाला. यातील कुर्ल्यातील 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू लेप्टोने झाल्याचे सांगण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाने सावध भूमिका घेतली. त्या मुलाच्या आजारपणात दिसणारी मिश्र लक्षणे ही प्रमुख अडथळा ठरत होती. मिश्र लक्षणांमुळे साथीच्या आजारांचेही निदान करणे किंचित कठीण होत आहे. त्याचवेळी मुंबईसारख्या कमी क्षेत्रफळात घन लोकवस्ती असलेल्या शहरातील साथीच्या आजारांचे आव्हान वाढत असल्याचेच समोर येत आहे.    

सध्या विचित्र वातावरणाचा अनुभव राज्यासह मुंबईकरही घेत आहेत. ऋतूबदल होताना साथीच्या आजारांचा प्रसार प्रामुख्याने होतो. वरपांगी दिसणारा तापही कोणत्या तरी साथीच्या रोगाची लक्षणे सांगूनच जातो. त्यामुळे मुंबईतील आरोग्याशी संबंधित असलेली सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. यात आरोग्य विभाग, किटकनाशक विभाग अगदी कचरा उचलणारेदेखील आले. कारण जेथे अस्वच्छता तिथे आजार पसरतात. हवामान बदलातून मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन, फ्लू,  हगवणीसारखे आजार तोंड वर काढतात. परिसरात स्वच्छता, दक्षता पोस्टर्स आणि बॅनर्समधून स्वच्छाग्रही होत आहोत. जून महिन्यात लेप्टोने मृत पावलेले गोवंडी, कुर्ला आणि मालाड या परिसरातील आहेत. मुंबईतील कोपरा न् कोपरा गर्दीने व्यापलेला आहे. माणसासह कचऱयाची-अस्वच्छतेचीही गर्दीच अधिक आहे. यामुळे एकदा पसरलेला साथीचा आजार नियंत्रणात आणण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारीदेखील साथीच्या आजारांविरोधात घटनास्थळी जाऊन लढा देत आहेत. आजाराचे उत्पत्ती †िठकाण कितीही संसर्ग असो, कोणत्याही ठिकाणी असो किंवा अन्य गंभीर स्थितीत असो पालिकेचा कामगार तिथे पोहोचून आजार पसरू नये म्हणून काम करत आहे. प्रत्यक्ष परिसर फिरून हे कर्मचारी काम करत असताना डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून काढणे, डासांच्या अळ्या ओळखणे, उंदीर मारणे, त्याचवेळी प्रतिबंधात्मक उपायही हाताळणे असे काम करत आहेत. आरोग्य अधिकारी, वॉर्ड अधिकारी, किटकनाशक अधिकारी, अशा अधिकाऱयांच्या नियंत्रणाखाली पालिका कर्मचाऱयांची टीम ठरली आहे. केलेल्या प्रत्येक कामाचा अहवाल वॉर्ड ऑफिसर, हेल्थ ऑफिसर, पेस्ट कंट्रोल ऑफिसर यांना कळविण्यात येतो. अळी सापडलेले ठिकाण, अळ्यांचा प्रकार, परिसराचे चित्रण आदिंचा अभ्यास केला जात आहे. 

एखाद्या रुग्णाला लेप्टो, स्वाईन फ्लू किंवा डेंग्यू, मलेरिया झाल्याचे निदान झाल्यास त्या रुग्णांची माहिती घेऊन अहवाल तयार केला जातो. यात रुग्ण राहत असलेले ठिकाण, त्या ठिकाणाचा पत्ता आदि बाबींची नोंद केली जाते. हा अहवाल वॉर्ड अधिकाऱयांकडे पाठवला जातो. तसेच तो आरोग्य अधिकाऱयांकडेही पाठवला जातो. या अहवालावरून संशयित रुग्णांच्या ठिकाणी पालिकेचे प्रतिबंधात्मक काळजी घेणारे कर्मचारी पाठवले जातात. धूर फवारणी करणारे, गटारांमधून साचलेल्या पाण्यावर औषध फवारणी करणारे, रॅट किलर कामगार संशयित रुग्णांच्या पत्त्यावर जातात. एखाद्या आजाराचा संशयित रुग्ण आढळून आल्यास त्या आजाराच्या शंभर ते दीडशे मीटर परिसरात त्या आजाराच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्या परिसरात पालिकेचे कर्मचारी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात करतात.

कोणत्याही आजाराचे प्रकरण ज्या ठिकाणी आढळून आले असेल त्या ठिकाणी तातडीने धूरफवारणी गांभीर्याने केली जाते. चार-पाच किलो वजनाचे यंत्र खांद्याला लावून पालिका कर्मचारी परिसरात फिरत असतो. सकाळी सात वाजता हजेरी लावली की अर्ध्या तासाच्या आत त्यांना ठरवून दिलेल्या साईटवर धूरफवारणी करण्यास निघून जावे लागते. पावसाळ्यांपूर्वीपासूनच साथीच्या आजारांविरोधातील कारवाईस सुरुवात होते. डासांच्या अळ्यांची पैदास होणारे टायर्स, साठवलेले भंगार, प्लास्टिकसारख्या निरुपयोगी वस्तू हटविण्यास सांगतात. मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरवणारे डास स्वच्छ पाण्यातच अधिक होत असतात. त्यामुळे घराघरात साठवलेले पाणी बदलण्यास सांगत असतात. पाण्याच्या टाक्यांची निरीक्षणे केली जातात. गटारांमध्ये साठलेले पाणी प्रवाहित केले जाते. उंदरांची पैदास होणाऱया कचरापुंडय़ा शोधून काढणे, उंदीर होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक सूचना सांगणे. आदि कामगिरी केली जाते. साथीच्या आजाराने प्रभावित असलेल्या उंदरांचे मल-मूत्र पाण्यात मिसळले गेल्यास हे मलमूत्रमिश्रित पाणी एखाद्या व्यक्तीच्या रक्तात संक्रमित झाल्यास ती व्यक्ती साथीच्या आजाराचा वाहक होऊ शकतो. आजार पसरविणाऱया घटकांमध्ये उंदीर हा प्राणी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. लेप्टोसारखा आजार उंदरांमुळे होतो. त्यामुळे पालिका विभागात रॅट किलर कर्मचाऱयांची टीम बांधण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी उंदीर मारणारे कर्मचारी उंदरांचा नाश करत असतात. दिवसादेखील उंदीर मारण्याचे काम सुरू असते. कुर्ल्यातील लेप्टो प्रकरणात त्या मुलाला रक्ताची उलटी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र रत्तस्त्राव होणे, उलटी होणे हे डेंग्यू आणि लेप्टो या दोन्ही आजारांमधील लक्षणे आहेत. हीच लक्षणे मिश्र आहेत. अशाने गोंधळ निर्माण होत आहे.

तसे पाहिल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. येथील प्रत्येकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षीच्या साथीच्या आजारातील रुग्णांमध्ये यावर्षी घसरण आहे असे सांगण्यात येत आहे. हे खरे असले तरीही मुंबईकरांच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडेच अधिक आशेने पाहिले जाते. शहराची ठेवण, भौगोलिक स्थान ही येथील बलस्थाने आहेत. तर कमी क्षेत्रफळातील घनदाट लोकवस्ती, त्यातून येणारी अस्वच्छता या सर्वांचे आव्हानही आहे. पालिका आरोग्य विभाग रात्रंदिवस झटत असला तरीही योग्यवेळी अचूक उपचार केल्यास टीकेची तीव्रता कमी होईलच पण त्याचवेळी प्रत्येक मुंबईकरात नवी उमेदही निर्माण होईल.

 

रामकृष्ण खांदारे

Related posts: