|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खटाव सरपंच निवड

खटाव सरपंच निवड 

वार्ताहर /खटाव  :

 खटाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी आज सौ. रत्नप्रभा उत्तमराव घाडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपळेश्वर संघटनेचे अध्यक्ष जि. प. सदस्य प्रदीप विधाते यांच्या हस्ते घाडगे यांचा सत्कार करण्यात आला.

      खटाव ग्रामपंचायतीवर गेली 20 वर्षे पिंपळेश्वर संघटनेचे वर्चस्व आहे. 2014 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर सुवर्णा मुगुटराव पवार यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. प्रदीप विधाते आणि संघटनेच्या पदाधिकायांनी ठरविल्याप्रमाणे गेल्या महिन्यात पवार यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. आज निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडून सौ. रत्नप्रभा उत्तमराव घाडगे यांची नूतन सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच सौ. सुवर्णा पवार  यांच्याकडून रत्नप्रभा घाडगे यांनी आज दुपारी पदभार स्विकारला.

     सरपंचपदी निवड झाल्यानंतर बोलताना रत्नप्रभा घाडगे म्हणाल्या, खटाव गावाला फार मोठा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. गावच्या विकासात्मक वाटचालीत जि. प. सदस्य प्रदीप विधाते यांच्या कल्पक नेतृत्वाखालील  पिंपळेश्वर संघटनेचा मोलाचा वाटा आहे. माझ्यावर प्रदीप आण्णा आणि संघटनेने विश्वास दाखवून सरपंचपदी काम करण्याची संधी दिली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेली संघटनेची विकासात्मक घोडदौड अधिक वेगाने पुढे सुरु ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली. ग्रामपंचायतीचे  सर्व सहकारी सदस्य आणि खटावकरांच्या सहकार्याने गावच्या हितासाठी झोकून देवून काम करणार असल्याचेही घाडगे यांनी सांगितले.