|Sunday, February 17, 2019
You are here: Home » क्रिडा » तैपेईच्या तेई तेजु यिंगचे सलग दुसरे विजेतेपद

तैपेईच्या तेई तेजु यिंगचे सलग दुसरे विजेतेपद 

पुरुषांत जपानचा केंटा मोमाटा अजिंक्य, अग्रमानांकित व्हिक्टर ऍक्लसेनवर मात

वृत्तसंस्था/ जकार्ता

चिनी तैपेईची स्टार खेळाडू व अग्रमानांकित तेई तेजु यिंगने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवताना रविवारी इंडोनेशिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गत आठवडय़ात तेईने मलेशियन मास्टर्स स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. याशिवाय, पुरुषांत जपानचा युवा खेळाडू केंटा मोमोटाने ही स्पर्धा जिंकली. अंतिम लढतीत त्याने डेन्मार्कच्या ऍक्लसेनला पराभवाचा धक्का दिला.

जकार्ता येथील राष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चिनी तैपेईच्या अग्रमानांकित तेईने चीनच्या चेन युफेईला 21-23, 21-15, 21-9 असे पराभूत केले. 63 मिनिटे चाललेल्या या संघर्षमय लढतीत चीनच्या युफेईने तेईला चांगलीच टक्कर दिली. मात्र, अनुभवी तेईने पहिला गेम गमावल्यानंतर दुसरा व तिसरा गेम जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, एकाच आठवडय़ातील तेईचे हे सलग दुसरे जेतेपद ठरले.

पुरुषांत जपानचा मोमोटा अजिंक्य

पुरुषांच्या अंतिम लढतीत मात्र जपानचा युवा खेळाडू केंटा मोमोटाने धक्कादायक निकालाची नोंद केली. मोमोटाने डेन्मार्कच्या अग्रमानांकित ऍक्सलसेनला 21-14, 21-9 असे सहजरित्या पराभूत केले. मोमोटाचे यंदाच्या वर्षातल हे पहिले जेतेपद ठरले. इंडोनेशियन ओपनमधील हे जेतेपद माझ्यासाठी खास आहे. आता पुढील आशियाई स्पर्धेतही ही चमकदार कामगिरी कायम ठेवण्याचा विश्वास मोमोटने व्यक्त केला.

याशिवाय, पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या फर्नाल्डी-सुकामिजिओ जोडीने प्रतिस्पर्धी जपानच्या इनाओ-कोनाकी जोडीला पराभवाचा धक्का दिला. पुरुष दुहेरीतील हा अंतिम सामना यजमानांच्या जोडीने 21-13, 21-16 असा जिंकला. याशिवाय, महिला गटात जपानच्या युकी फुकुशिमा व सयाका हिरोटा जोडीने विजेतेपद पटकावले. 55 मिनिटे चाललेल्या अंतिम लढतीत जापनीज जोडीने मायदेशी सहकारी मायु-वाकाना हिरोमोटा जोडीला पराभूत केले.

Related posts: