|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरुच

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरुच 

66 घरे, 7 गोठय़ांची पडझड : 31 लाखाचे नुकसान

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी संपूर्ण जिल्हय़ाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवस जिल्हय़ात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसात 66 घरे, सात गोठय़ांची पडझड, पाच जनावरे व दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण 31 लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र नुकसानीची परिपूर्ण माहिती तालुकास्तरावरून आली नसल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे.

जिल्हय़ात गेल्या चार दिवसांत सरासरी 50 मिलीमिटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मात्र अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. जिल्हय़ात जूनअखेर सुमारे 31 लाखाचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. मात्र त्यानंतर जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात पाऊस होऊन नुकसानीच्या घटना घडलेल्या असतानाही जिल्हा प्रशासनाकडे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीचा आकडा स्थिरावलेलाच आहे. मंगळवारी घेतलेल्या माहितीनुसार जिल्हय़ात आतापर्यंत 31 लाख 31 हजार 715 एवढेच नुकसान झाल्याची नोंद आहे. यावरून जिल्हा प्रशासन शेतकऱयांच्या नुकसानीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

 आतापर्यंत नोंद झालेले नुकसान

  नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे 7 लाख 20 हजार रुपयांचे, तर खासगी मालमत्तेचे 3 लाख 50 हजाराचे असे मिळून 13 लाख 90 हजार 246 रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पूर्णत: व अंशत: पडलेल्या सात गोठय़ांचे 2 लाख 2 हजार 250 रुपयांचे, तर पूर्णत: व अंशत: पडलेल्या 66 घरांचे 13 लाख 59 हजार 330 रुपयांचे नुकसान झाले आहे. मृत पाच जनावरांचे 1 लाख 80 हजार 215 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यांकडे दुर्लक्ष

 जिल्हय़ात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, गोठे यांच्यासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. जिल्हय़ातील तलाठय़ांसह महसूल कर्मचारी सातबारा संगणकीकरणात गुंतले असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष केला जात आहे.

Related posts: