|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीचा लोकसंख्येला लगाम…कन्येला मात्र सलाम!

रत्नागिरीचा लोकसंख्येला लगाम…कन्येला मात्र सलाम! 

शहरी लोकसंख्येत 73 टक्क्यांची वाढ

दशकात लोकसंख्येवर नियंत्रण

मुलींच्या जन्मदरात जिल्हा राज्यात प्रथम

2018 मध्ये जन्मदरात 2 टक्क्यांनी घट

विजय पाडावे /रत्नागिरी

एकीकडे देशाची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असताना रत्नागिरी जिल्हा मात्र याला अपवाद ठरला आहे. 2001 ते 2011 या दशकाने लोकसंख्यावाढीला लगाम घातला आहे. 2001 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर 9.89 टक्के होता तो 2011 च्या जनगणनेत -4.96 टक्क्यांने खाली आला आहे. 2011 मध्ये जिल्हय़ाच्या लोकसंख्येत 81 हजार 708 ने घट झाली आहे. याचवेळी मुलींच्या जन्मदरात जिह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. यामुळे लोकसंख्येला लगाम घालतानाच जिह्यातील समंजस ‘आई-बाबां’नी मुलींच्या आगमनाला सलाम ठोकल्याचे चांगले चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लोकसंख्या नियंत्रणासाठी वैद्यकीय क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल, लोकांची बदलत असलेली मानसिकता याचा हा परिणाम आहे. रत्नागिरी जिल्हा 2011 पर्यंत लोकसंख्या कमी करण्यात चौथ्या स्थानावर होता. 2014 मध्ये जिल्हय़ाने लोकसंख्या नियंत्रणात तिसरे स्थान पटकावले. जनजागृती मोहिमेला असाच प्रतिसाद मिळाल्यास येत्या 2 वर्षात रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. एक वा दोन मुले झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण जिह्यात सर्वाधिक आहे.

दरवर्षी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सर्वत्र साजरा होतो. भारताने लोकसंख्येची 125 कोटीची सीमा ओलांडली आहे. महासत्तेकडे मार्गक्रमण करणाऱया या देशात निरक्षरता, बेकारी, दारिद्रय़, विषमता, महागाई, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न प्रगतीत अडसर निर्माण करत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आता शासन स्तरावरून लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृतीचे प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. स्त्री शिक्षण, पुरूष नसबंदी, स्त्री नसबंदी, जन्मनोंद, योग्य वयात लग्न, उच्च प्रतिजैवकांचा वापर, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबवले जात आहेत. माता बाल संगोपन कार्यक्रम, लसीकरण, संसर्गजन्य आजारावर सुयोग्य उपचार आणि नियंत्रण यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे.

2001च्या जनगणनेनुसार जिल्हय़ाची एकूण लोकसंख्या 16.96 लाख होती. त्यापैकी 89 टक्के ग्रामीण लोकसंख्या होती. जिल्हय़ात स्त्री-पुरूष प्रमाण 1136 इतके आहे. 1991 ते 2001 या दशकामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग 9.89 टक्के असून शहरी भागात तो 39.23 टक्के एवढा होता. 2018 मध्ये राज्याचा जन्मदर 16.7 टक्के असताना रत्नागिरी जिल्हय़ाचा जन्मदर 10.89 टक्के राहिला आहे तर माता मृत्यूदर 0.40 टक्के इतका असल्याचे सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाकडे जन्म व मृत्यूदराची उपलब्ध आकडेवारी-

गट          2005   2011   2014    2018

जन्मदर     18.9   17.8    12.3   10.89

मृत्यूदर     11.4    10.1     7.1      8.00

ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर

रत्नागिरी जिल्हय़ाच्या लोकसंख्या नियंत्रणात येथील लोकांचे स्थलांतर ही बाबही प्रकर्षाने समोर येत आहे. येथील ग्रामीण लोकांचे नोकरी, व्यवसायानिमित्ताने मोठय़ा शहरांकडे झालेले स्थलांतर हे ही कारण आहे. 2001 च्या जनगणनेनुसार जिल्हय़ातील 16.96 लोकसंख्येपैकी ग्रामीण 15 लाख तर शहरी 1 लाख 92 हजार लोकसंख्या होती. मात्र 2011 च्या जनगणनेत एकूण 16.15 लाख लोकसंख्येत ग्रामीण लोकसंख्या 13 लाख तर शहरी लोकसंख्या 2 लाख 63 हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले.

लोकसंख्या नियंत्रणाबाबतच्या उपक्रमाला जिल्हय़ात प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हय़ाचा जन्मदर महाराष्ट्रात इतर जिल्ह्य़ांच्या मानाने खूपच कमी होत आहे. रत्नागिरीचा जन्मदर 12 टक्क्यांच्या खालीच राहिला आहे. आरोग्य विभागामार्फत केल्या जात असलेल्या लोकजागृतीपर उपक्रम व उपाययोजनांमध्येही येथील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून ही जिल्हय़ासाठी अभिमानास्पद बाब आहे.

डॉ. अनिरुध्द आठल्ये,

जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

रत्नागिरी जिल्हा लोकसंख्या नियंत्रणाची ठळक वैशिष्टय़े-

एक वा दोन मुलांचे नियोजन.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाण वाढले.

मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ.

Related posts: