|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आयुक्तांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचारी रस्त्यावर

आयुक्तांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचारी रस्त्यावर 

प्रतिनिधी/ सोलापूर

महापालिका उत्पन्न वाढीसाठी, म्हणजेच शहर विकासासाठी आणि कर्मचाऱयांच्या हितासाठी पालिका गाळ्यांचा ई-निविदा लिलाव झालाच पाहिजे. ’आयुक्त तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’… च्या घोषणा देत महापालिकेसमोर हजारो कर्मचाऱयांनी बुधवारी सकाळी जोरदार निदर्शने केली. यातून गाळे लिलाव व आयुक्तांच्या समर्थनार्थ वज्रमुठ आवळल्याचे दिसून आले.

  शासनाच्या आदेशानुसार सोलापूर महापालिकेच्या एक हजार 386 मेजर व मिनी गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे. गाळे लिलावास, गाळेधारक व्यापारी, राजकीय मंडळी आणि काही नगरसेवकांनी विरोध केला असून आंदोलनही केले. दरम्यान या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेर्तृत्वाखाली पालिका आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. सकाळी 11 च्या सुमारास पालिका आवारात पालिकेचे हजारो कर्मचारी व अधिकारी एकवटले. कामगार एकजुटीचा विजय असो यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. निदर्शनानंतर आयोजित सभेत कामगार संघटनेच्या पदाधिकायांनी भाषणात गाळे लिलावाचे जोरदार समर्थन करत पालिका आयुक्त ढाकणे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.  गाळे लिलाव झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. दडपशाही खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला.

 कामगार नेते अशोक जानराव यांनी व्यापारी व त्यांचे समर्थन करणायांवर तोफ डागली. खरपूस समाचार घेतला. महानगरपालिकेत सातत्यानं कामगारांची बाजू आमच्या संघटनेने मांडली. जे आज आमच्या विरोधात पोस्ट टाकतात ते जन्मले नव्हते, राजकारणात नव्हते, तेव्हापासून आम्ही कामगारांचे नेतृत्व करत आहोत. योग्यवेळी अधिकायांच्या पाठीशी उभारतो. आमची संघटना जुनी आहे, जाणती आहे .आज आयुक्तांविरुद्ध भूमिका घेणायांचे आई-वडील आमच्या संघटनेत होते.आजोबाला नातू शिकवतो असा घणाघात अशोक जानराव यांनी केला. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असे सांगत, महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. कामगारांना नियमित पगार मिळतील. गोरगरीब कामगार अडचणीत येणार नाही म्हणून आम्ही आयुक्तांच्या उत्पन्नवाढीच्या भूमिकेला आणि त्यांना पाठिंबा देत आहोत. व्यापायांचे लाड पुरवणाया नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सभेमध्ये कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत म्हणून कधी आवाज उठवला का असा सवालही अशोक जानराव यांनी केला.

  मुठभर व्यापारी आयुक्तांवर दबाव आणून खिळ घालत आहेत. गुडेवारांप्रमाणेच आयुक्त ढाकणे यांची बदली होऊ देणार नाही. व्यापायाचा लाड का? असे केले तर पालिका रसातळाला जाईल. आडम मास्तर सारखे लोक भांडवदाराच्या मागे जाणे योग्य नाही. नगरसेवक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भांडवशाहीच्या मागे जात आहेत.सरकारने पसरी खाल्ली तर महापालिकेची अधोगती होईल. सरकारने कायद्याच्या विरोधात जाऊन व्यापायांना गाळे दिले तर आम्ही प्रतीआंदोलन करु असा इशारा अशोक जानराव यांनी दिला आहे. धनदांडग्या व्यापायांकडून आयुक्तांवर होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत. 1400 पैकी केवळ मुठभर व्यापायासाठी इतर व्यापायांवर अन्याय का असा सवाल बाबासाहेब क्षिरसागर यांनी उपस्थित केला.

छावा संघटननेने आयुक्तांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे असे सांगून अध्यक्ष योगेश पवार म्हणाले , व्यापारी संघटना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे . त्याला साथ देणारे महापालिकेचे नगरसेवक किंवा विविध राजकीय पक्ष त्यांच्याकडून निवडणूक भंडारा मिळावा म्हणून त्यांच्या पाठीशी आहेत पण जनता आयुक्तांच्या पाठीशी आहे. गाळे लिलाव झाला पाहिजे अशी मागणी केली. कामगार नेते जनार्दन शिंदे यांनी मास्तर यांचं नाव घेऊन जोरदार टीका केली. ते म्हणाले अनेक दिवस महापालिकेच्या कामगारांचा पगार वेळेवर होत नाही. उत्पन्नाअभावी परिवहन बंद पडलं. यावेळी आमदार आडम कामगारांची बाजू घेत असल्याचे दाखवतात पण प्रसंग उत्पन्नवाढीचा येतो त्यावेळी मात्र व्यापायांच्या बाजूने उभारले ही दुहेरी भूमिका चालणार नाही. शहर विकासासाठी पैसे लागतात. तेव्हा वेळोवेळी भाडेवाढ होण्याची गरज आहे. पालिका कॉन्ट्रक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत भोसले म्हणाले, ठेकेदारांची 500 कोटीची देणी आहेत. त्यासाठी निधी महत्त्वाचा आहे. उत्पन्न वाढीसाठी आयुक्त प्रयत्नशील आहेत.

  प्रास्ताविक भाषणात प्रदीप जोशी म्हणाले, आयुक्त एकटे नाहीत आम्ही कर्मचारी त्यांच्या सोबत आहोत. आयुक्तांच्या बदलीची सुपारी घेऊन काही लोक कामाला लागले आहेत असा आरोप केला. गाळे लिलावातून महिना 18 कोटीचे उत्पन्न मिळणार आहे. शहर विकासासाठी ते गरजेचे आहे. असे सांगितले.

यावेळी विचार मंचावर दिपक दोडय़ानूर, विजयकुमार कांबळे, मोहन कांबळे, सारिका अकुलवार, डॉ. शुभांगी ताजणे, शाशि शिरसट, आर.पी. गायकवाड, भालचंद्र साखरे, अजय क्षीरसागर, श्रीनिवास रामगल, बाली मंडेपू, मुकुंद कांबळे, झेड. ए. नाईकवाडी, नागनाथ गदवालकर, एस.एम. अवताडे, बापू सदाफुले, शिवाजी कांबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related posts: