|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साळावली धरणाचा जलाशय तुडुंब

साळावली धरणाचा जलाशय तुडुंब 

प्रतिनिधी/ सांगे

निसर्गप्रेमी व पर्यटक दरवर्षी ज्याची मोठय़ा आतूरतेने वाट पाहतात तो साळावली धरणाचा जलाशय भरून वाहण्याचा क्षण अखेर काल बुधवारी आला. सायंकाळी 4.15 च्या सुमारास सदर जलाशय तुडुंब भरून वाहू लागला. ही वार्ता वाऱयासारखी पसरताच अनेक पर्यटकांनी साळावलीच्या जलाशयाकडे धाव घेऊन या विहंगम दृष्याचा आनंद लुटला.

जेव्हा जलाशयातील पाणी 41.15 मीटरची पातळी पार करते तेव्हा जलाशय भरून वाहू लागतो. गेल्या काही दिवसांपासून सांगेच्या डोंगरमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पंधरा दिवस अगोदरच जलाशय भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी जलाशय 25 जुलै रोजी भरून वाहू लागला होता. धरणाच्या इतिहासात 11 जुलै इतक्या लवकर जलाशय भरून वाहण्याची ही पहिलीच खेप आहे, अशी माहिती जलस्रोत खात्यातील सूत्रांनी दिली.

पर्यटकांकडून आतूरतेने प्रतीक्षा

जलाशय कधी भरून वाहतो याची पर्यटक वाटच पाहत होते. कारण धबधबे, ओहोळ हे कधीच प्रवाहित झालेले असून पर्यटकांनी यापूर्वीच त्यांचा आनंद लुटला आहे. आता देशीच नव्हे, तर विदेशी पर्यटकांचीही साळावली धरणावर भरपूर गर्दी होणार आहे. जलाशयात ज्या ठिकाणी पाणी खाली कोसळते त्या ठिकाणाहून जे तुषार उसळतात ते अनुभवण्याची मजा काही औरच असते. त्याशिवाय ऊन असल्यास जलाशयाच्या परिसरात इंद्रधनुष्याचेही दर्शन घडत असते. तेही पर्यटकांसाठी एक वेगळे आकर्षण असते. पुढील चार महिने धरण परिसर पर्यटकांनी न्हावून निघणार आहे.

बॉटनिकल गार्डनचे आकर्षण

भरपूर पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बॉटनिकल गार्डनमधील हिरवळही आकर्षक बनली आहे. त्यामुळे येथे हिरवागार गालिचा पसरविल्यागत सध्या वाटत आहे. या ठिकाणी आता युवक-युवतींची मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे.

विविध समस्या कायम

मात्र अजूनही साळावली धरण परिसरात तसेच बॉटनिकल गार्डन परिसरात अनेक समस्या भेडसावणे कायम आहे. त्यात खास करून रात्रीच्या वेळी धरणावरचे पथदीप पेटत नाहीत. तसेच येथे गाडय़ा पार्क करण्यासाठी जी जागा तयार करण्यात आली आहे, त्या जागेचे काम अजून शिल्लक आहे. त्यामुळे पर्यटकांना आपली वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागतात. या प्रकारामुळे खास करून शनिवारी, रविवारी व सुट्टय़ांच्या दिवशी येथे मोठय़ा समस्या निर्माण होतात.

मद्यधुंद पर्यटकांना आवरणे आवश्यक

तसेच ज्या ठिकाणी जलाशयात पाणी खाली कोसळते त्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱया पर्यटकांना आवर घालणे आवश्यक आहे. कारण हा अतिसंवेदनशील भाग आहे. या ठिकाणी आणखी सुरक्षा रक्षकांची गरजही दिसून येत आहे. साळावली धरणाचा जलाशय भरून वाहू लागणे ही हल्लीच्या काळात आकर्षणाची घटना बनली आहे. त्याची दखल घेऊन पर्यटन खात्याने या ठिकाणी पर्यटकांना विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Related posts: