|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अरगन तलावाशेजारील वळणे हटविण्याची मागणी

अरगन तलावाशेजारील वळणे हटविण्याची मागणी 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून विशेषता अरगन तलाव चौक ते गणपती मंदिरपर्यत वाहनांच्या रांगा लागत आहेत. एखादे अवजड वाहन किंवा बस या परिसरामधून जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघात घडत आहेत. यामुळे अरगन तलाव ते गणपती मंदिरपर्यंतचा रस्त्यावरील वळणे हटवून सरळ करण्याची मागणी होत आहे.

बेळगाव-वेंगुर्ला हा रस्ता राज्यमार्ग असून महाराष्ट्र व गोव्याला जाण्यासाठी सोयीचा आहे. यामुळे रस्त्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. दररोज पन्नासहून  अधिक ट्रक भाजी घेऊन गोव्याला जात असतात. सध्या हा रस्ता खूपच वर्दळीचा बनला आहे. हजारो वाहने रस्त्यावरून ये-जा करीत असतात. पण हा रस्ता काही ठिकाणी अडचणीचा बनला असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनला आहे.  गणपती मंदिरपरिसरात अरगन तलावशेजारी अनेक वळणे असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. गणपती मंदिर ते अरगन तलाव चौकापर्यत रस्ता अरूंद असून बेळगावकडे जाताना चढण लागते.

जीव धोक्मयात घालून ओव्हरटेक

या परिसरामधून एखादे अवजड वाहन किंवा परिवहन मंडळाची बस जात असल्यास अन्य वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसतो. तसेच वळणे असल्याने ओव्हरटेक करणे धोकादायक आहे. काहीवेळा दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक जीव धोक्मयात घालून ओव्हरटेक करताना दिसतात. अशामुळे अपघात घडत आहेत. यामुळे या दरम्यानची वळणे हटवून सरळ रस्ता करण्याची गरज आहे.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे वळणे हटवून रस्ता सरळ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण सदर जागा मिलीटरीची असल्याने परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामुळे रस्ता रूंदीकरण आणि वळणे हटविण्याचा प्रस्ताव मिलीटरी प्रशासनाकडे 2012 मध्ये देण्यात आला होता. पण त्यावेळेच्या मिलीटरी प्रशासनाच्या अधिकाऱयांनी परवानगी नाकारली होती. यामुळे रस्ता सरळ करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. पण अलिकडे मिलीटरी प्रशासनाने संरक्षक भिंत घालण्याचे काम हाती घेतले असल्याने रस्त्यावरील वळणे हटविण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संरक्षक भिंत बांधल्यास रस्त्याचे काम करताना भिंत हटवावी लागणार आहे. यामुळे रस्त्याचा प्रस्तावाबाबत सार्वजनिक बांधकाम खाते आणि मिलिटरी अधिकाऱयांनी चर्चा करावी. रस्त्याचे काम हाती घेऊन याठिकाणी होणारे अपघात टाळावे अशी अशी मागणी होत आहे.