|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुतात्मा जवानांना अखेरचा सलाम

हुतात्मा जवानांना अखेरचा सलाम 

आप्पाजी पाटील / नंदगड

शहीद जवान संतोष गुरव अमर रहे, जय जवान जय किसान, बोलो भारत माता की जय, या घोषणांनी संपूर्ण हलगा गाव दणाणून सोडण्यात आला. आपल्या गावच्या लाडक्या जवानाला अखेरचा सलाम देण्यासाठी अबालवृद्धांपासून सर्वजण एकवटले होते. शासकीय अधिकाऱयांसह खानापूर तालुक्यातील हजारो लोक सहभागी झाले होते. भावपूर्ण वातावरणात हुतात्मा जवान संतोष गुरव यांच्यावर बुधवारी दुपारी 1.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

छत्तीसगड राज्यातील बस्तर विभागात नक्षलवाद्यांनी सोमवारी केलेल्या भू-सुरुंग स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले होते. यात खानापूर तालुक्यातील हलगा गावचा संतोष लक्ष्मण गुरव (वय 27) तर कारवारचा विजयानंद सुरेश नाईक (वय 28) यांचा समावेश होता. सोमवार दि. 9 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास वरील दोघेही दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी जात होते. बस्तर विभागातील ताडबाऊली गावाजवळ झालेल्या भू-सुरुंग स्फोटात त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.

छत्तीसगड येथील रायपूरहून मुंबई येथे व मुंबई येथून गोव्याला विमानाने दोघांचेही पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर संतोष गुरव यांचे पार्थिव गोव्याहून अनमोडमार्गे खानापूरला आणण्यात आले. नंदगड हलशीमार्गे हलग्याला नेण्यात आले.

नंदगड येथे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पदवीपूर्व महाविद्यालयातर्फे संतोषच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यात आले. त्यानंतर हलशी ग्रामस्थांतर्फे पुष्पमाळ घालून अभिवादन करण्यात आले. हलशी येथील शाळा विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. हलगा येथे सजविलेल्या ट्रक्टरमध्ये पार्थिव ठेवून  गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. संतोष पूर्वी ज्या शाळेत शिकला त्या हलगा प्राथमिक शाळेचे वनश्री हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक तसेच  ग्रामस्थ, नातेवाईक मिरवणुकीत सहभागी झाले होते. पार्थिव घराकडे नेण्यात येऊन कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतले. हलगा मराठी शाळेच्या आवारात पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी रांगेने येऊन अंतिम दर्शन घेतले. 

यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, माजी ग्रा. पं. सदस्य रणजित पाटील, अर्जुन देसाई, म. ए. समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, विठ्ठल पाटील, मार्केटींग सोसायटीचे गोपाळ पाटील, डी. एम. गुरव. ग्रा. पं. अध्यक्षा वैशाली सुतार, विठ्ठल गुरव, महाबळेश्वर पाटील, नागेशी पठाण यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समिती, भाजप, श्रीराम सेना, साईकृष्ण सेवा प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, कुस्ती संघटना, हलगा ग्रा. पं., हलगा कलमेश्वर मल्टीपर्पज सोसायटी तसेच सिद्धकला मित्रमंडळ पुणे आदींच्यावतीने व प्रशासनाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर सजविलेल्या ट्रक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आले. संतोषचे वडील लक्ष्मण गुरव यांनी भडाग्नी दिला. यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी झियाउल्ला एस., जि. पं. चे कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, प्रांताधिकारी कविता योगपन्नावर, तहसीलदार शिवानंद उळागड्डी, ता. पं. कार्यकारी अधिकारी पी. बी. कट्टी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, श्रीराम सेनेचे अध्यक्ष पंडित ओगले आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.

 कुटुंबीयांनी फोडला एकच हंबरडा

संतोषचा मृतदेह घराजवळ येताच त्यांची पत्नी राजश्री, वडील लक्ष्मण, आई प्रेमीली व बहिणींनी एकच हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.

हलगा येथे संतोषचे स्मारक व्हावे

संतोष गुरव देशरक्षणासाठी हुतात्मा झाला. त्याची आठवण म्हणून हलगा गावात संतोषच्या नावे स्मारक व्हावे, अशी इच्छा तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी आपल्या संस्थेतर्फे 51 हजार रुपये देण्याचे जाहीर केले.

वाघासारखा माझा मुलगा देशसेवेसाठी झटला

जीवनात प्रसंगी मोलमजुरी करून स्वत:च्या तीन मुलींसह मुलाला लहानाचे मोठे करून शिक्षण दिले. घरी आल्यावर नेहमीच तो आम्हाला वाघासारखा मदत करी. आता आनंदाचे दिवस येतील, असे वाटत असतानाच माझा मुलगा संतोष नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ठार झाला. एकीकडे एकुलता मुलगा गेल्याचे दु:ख आहेच. परंतु देशसेवेसाठी माझा मुलगा हुतात्मा झाला, याचा अभिमानही असल्याचे वक्तव्य संतोषचे वडील लक्ष्मण गुरव यांनी व्यक्त केले.

नक्षलवाद्यांचा बदला घ्या

ज्या नक्षलवाद्यांनी बॉम्ब स्फोट घडवून माझ्या नवऱयाचा प्राण घेतला. त्याचा बदला घ्या, अशी संतप्त भावना संतोषची पत्नी राजश्री हिने यावेळी व्यक्त केली.

संतोष देशासाठी लढला

संतोष गुरव देशाच्या संरक्षणासाठी लढला. अनेक हालअपेष्ठा सोसूनही त्याने देशासाठी दिलेले बलिदान कधीही विसरून चालणार नाही, असे मत माजी आमदार अरविंद पाटील यांनी मांडले.

पुणे मित्रमंडळातर्फे 51 हजार

संतोष गुरव यांचे पुणे येथे अनेक मित्र आहेत. संतोषच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे अनेक मित्र पुण्याहून हलग्याला दाखल झाले. त्यांनी संतोषच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 51 हजार रुपये देण्याची घोषणा केली.

आमदार निंबाळकर यांचा शोक संदेश

खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी संतोष गुरवच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठविला आहे. शासनाच्यावतीने संतोषच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

 

भावाला  बांधली अखेरची राखी

संतोष गुरव हा एकुलता मुलगा तर त्याला तीन बहिणी आहेत. आपल्या भावाचे अंतिम दर्शन घेताना बहिणींनी एकच हंबरडा फोडला. त्यांनी भावाच्या अंतिम दर्शनावेळी राख्या आणल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या भावाला अखेरची राखी बांधली. हा प्रसंग पाहून सर्वांचेच हृदय हेलावून गेले.

Related posts: