|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » कुलदीपसमोर इंग्लंडचे पुन्हा लोटांगण

कुलदीपसमोर इंग्लंडचे पुन्हा लोटांगण 

वृत्तसंस्था /नॉटिंगहॅम :

चायनामन स्पिनर कुलदीप यादवने पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या जाळय़ात अडकवत वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्यामुळे यजमान संघाचा डाव पहिल्या वनडेत 268 धावांतच आटोपला. कुलदीपने 10 षटकांत केवळ 25 धावा देत इंग्लंडचे 6 गडी बाद केले. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्स व जोस बटलर यांनी अर्धशतके नोंदवली.

कर्णधार विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर इंग्लंड संघाची कथा टी-20 मालिकेतील सामन्यांप्रमाणेच उलगडली. कुलदीपकडे चेंडू सोपविल्यानंतर इंग्लंडची घसरण सुरू झाल्याचे दिसून आले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला त्याची फिरकी ओळखता आली नाही, हे त्याच्या 10-0-25-6 या पृथक्करणावरून दिसून येते. त्याने 10 षटकांत तब्बल 38 चेंडू निर्धाव टाकले आणि वैशिष्टय़ म्हणजे त्याला एकही चौकार वा षटकार ठोकला गेला नाही. पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची वनडेतील त्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी मँचेस्टरमधील टी-20 सामन्यातही त्याने पाच बळी मिळविण्याची किमया केली होती. इंग्लंडच्या फलंदाजांपैकी नेहमीप्रमाणे बटलर (51 चेंडूत 5 चौकारांसह 53) सर्वात सफाईदारपणे खेळताना दिसला तर बेन स्टोक्सने (103 चेंडूत केवळ 2 चौकारांसह 50) खूप संघर्ष करीत अर्धशतक नोंदवले. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 93 धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण या सेट झालेल्या फलंदाजांना कुलदीपने झटपट बाद करून त्यांच्या घसरणीला सुरुवात केली.

मोईन अली (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 24) व आदिल रशिद (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 22) यांनी थोडीफार भर घातल्याने संघाला अडीचशेचा टप्पा पार करता आला. इंग्लंडचा डाव शेवटच्या षटकांत 268 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या ‘कोलॅप्स’ला केवळ कुलदीप जबाबदार ठरला. कारण इतर गोलंदाजांना फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. उमेश यादवने 9.5 षटकांत 70 धावांत 2 तर चहलने 10 षटकांत 51 धावा देत 1 बळी मिळविला. पदार्पणवीर सिद्धार्थ कौलने 10 षटकांत 62 धावा देत एकही बळी मिळविला नाही. जेसन रॉय (35 चेंडूत 6 चौकारांसह 3) व जॉन बेअरस्टो (35 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 38) यांनी प्रारंभी यादव व कौल यांच्यावर हल्ला चढवित 73 धावांची दमदार सुरुवात करून दिली होती.

सलामीसाठी त्यांनी 73 धावांची भागीदारी केली. रिव्हर्स स्वीप मारण्यात चूक झाल्याने रॉय बाद झाला. 13 व्या षटकात रूट (3) कुलदीपच्या लेगब्रेकवर फसला आणि पायचीत झाला. चार चेंडूनंतर बेअरस्टो गुगलीवर पायचीत झाला. डीआरएसच्या आधारो हा निर्णय घेतला गेला. 16 चेंडूत 9 धावांची भर घालून इंग्लंडचे 3 फलंदाज बाद झाले. नंतर चहलने कर्णधार मॉर्गनला (20 चेडूत 19) कव्हरमध्ये झेलबाद केले. 4 बाद 105 अशा स्थितीनंतर बटलर व स्टोक्स यांनी थोडाफार डाव सावरला.

 

 जास्त गडी बाद झाले असल्याने त्यांनी आक्रमणाऐवजी बचावावर अधिक भर द्यावा लागला. बटलरने 18 वे अर्धशतक 45 चेंडूत पूर्ण केले तर स्टोक्सने 12 व्या अर्धशतकासाठी 102 चेंडू घेतले. कुलदीपने 45 व्या षटकात कौलकरवी त्याला झेलबाद केले. पाच चेंडूनंतर त्याने डेव्हिड विलीचाही (1) बळी मिळविला. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर प्लंकेट धावचीत झाल्यानंतर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला.

 

Related posts: