|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » देशात सार्वजनिक बँका केवळ 2-3 असाव्यात!

देशात सार्वजनिक बँका केवळ 2-3 असाव्यात! 

खासगी बँका अधिक असाव्या : सुब्रमण्यम्

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये निवडक बँका असाव्यात, असे मावळते मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम् यांनी मत व्यक्त केले. सरकारी बँकांपेक्षा खासगी क्षेत्रातील बँकांची संख्या जास्त असावी. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या  दोन ते तीन असावी, असे सुब्रमण्यम् यांनी म्हटले.

देशातील बँकिंग क्षेत्राची स्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. यासाठी अनेक पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासकीय कामकाम सुधारणे, खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग होण्याची आवश्यकता आहे. एक ते दोन विदेशी बँकांची देशाला गरज आहे, असे त्यांनी म्हटले.

सरकार आणि आरबीआय यांचा उद्देश वेगवेगळा असल्याने काम करण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळेपणा आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर मतभेद असण्याची शक्यता आहे. समस्या कशा प्रकारे सोडविण्यात यावी यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी मुलाखतीवेळी म्हटले.

नोटाबंदीविषयी मत व्यक्त करताना त्यांनी याचा परिणाम अद्याप दिसणे शक्य नाही. यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी जाणे आवश्यक आहे. नोटाबंदीनंतर जो पैसा परत आलेला नाही, त्यामुळे काळा पैसाधारकांना दणका बसलेला नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे त्यांनी म्हटले. सुब्रमण्यम् यांनी 26 जुलैपासून पदभार सोडणार असल्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले.