|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » ‘फोर्टिस’ आयएचएच हेल्थकेअरकडे

‘फोर्टिस’ आयएचएच हेल्थकेअरकडे 

4 हजार कोटीची गुंतवणूक  कंपनी समभागात 5 टक्क्यांपर्यंत तेजी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मलेशियातील आयएचएच हेल्थकेअरकडून अधिग्रहणासाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव फोर्टिस हेल्थकेअरच्या संचालक मंडळाकडून मंजूर करण्यात आला. त्यामुळे रोख रकमेची कमतरता भासणारी फोर्टिस रुग्णालयांची चेन मलेशियाच्या कंपनीकडे जाणार आहे. आयएचएच हेल्थकेअर आता फोर्टिसमध्ये 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 170 रुपये प्रतिसमभाग या दराने ही गुंतवणूक करणार आहे आणि सामान्य गुंतवणूकदारांकडून 26 टक्के समभाग खरेदी करण्यासाठी खुली ऑफर लवकर आणण्यात येईल.

हीरो समूहाचे मुंजाळ आणि डाबरचे बर्मन यांनी संयुक्तपणे फोर्टिस खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. मात्र त्यांनी नंतर माघार घेतली. 3 जुलै रोजी फोर्टिसकडून नव्याने लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयएचएच आणि टीपीजी-मणिपाल यांनी बोली लावली होती. आता या अधिग्रहणासाठी समभागधारक आणि सीसीआयची मंजुरी घ्यावी लागणार आहे. फोर्टिसकडे सध्या 2,500 कोटी रुपयांचे कर्ज असून त्याची जबाबदारी आयएचएच घेईल. या बातमीनंतर फोर्टिसचा समभाग 4.80 टक्क्यांनी वधारत बंद झाला.