|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपाच्या चारही उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध

भाजपाच्या चारही उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध 

प्रतिनिधी/ मिरज

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी हरकती घेतलेल्या भाजपाच्या चारही उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी शुक्रवारी वैध ठरविले. याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता होती. अर्ज वैध ठरताच भाजपा समर्थकांनी कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी चुकीचे कारण पुढे करुन हरकती नोंदविल्या, असा आरोप भाजपा उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना केला.

महापालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जांची गुरूवारी बालगंधर्व नाटय़गृह आणि मिरज विभागीय कार्यालयात छाननी झाली होती. छाननीवेळी भाजपाचे प्रभाग तीनमधील उमेदवार संदीप आवटी, प्रभाग सातमधील उमेदवार गणेश माळी व सौ. संगीता खोत आणि प्रभाग 20 मधील विवेक कांबळे आणि सौ. जयश्री कुरणे या पाच उमेदवारांविरुध्द हरकती घेण्यात आल्या होत्या. काँग्रेसचे सचिन जाधव, करण जामदार, सौ. धोंडूबाई कलगुटगी, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात आणि सौ. संगीता हारगे यांनी या हरकती नोंदविल्या होत्या. याबाबत गुरूवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या वकील पॅनेलने आपापल्या उमेदवारांची बाजू मांडली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी निकाल राखीव ठेवला होता.

आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता निकाल होणार असल्याने दोन्ही बाजूकडील उमेदवार समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर निकाल एक वाजता देण्याचे जाहीर करण्यात आले. पण, प्रत्यक्षात तीन वाजता निकाल जाहीर झाला. यामध्ये चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे जाहीर करण्यात आले. संदीप आवटी यांचा अर्ज गुरूवारी रात्रीच वैध ठरविण्यात आला होता. आवटी यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचा, गणेश माळी यांच्यावर महापालिका ठेकेदार असल्याचा, सौ. संगीता खोत यांच्यावर मजूर सोसायटीचे संचालक असल्याचा, विवेक कांबळे यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचा तर सौ. जयश्री कुरणे यांच्यावर नवीन खरेदी केलेल्या मिळकतीची घरपट्टी भरली नसल्याबाबतच्या हरकती होत्या.

निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी या हरकती अमान्य करुन सर्वांचे अर्ज वैध ठरविले. जयश्री कुरणे यांच्या हरकतीवर निवडणूक अधिकाऱयांकडून योग्य न्याय न मिळाल्याने आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे सौ. संगीता हारगे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, गणेश माळी, विवेक कांबळे, सौ. संगीता खोत आणि सौ. जयश्री कुरणे यांनी, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी चुकीचे आरोप करुन हरकती नोंदविल्या असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आम्ही अर्ज वैध ठरवून पहिली लढाई जिंकली आहे. आता निवडणूक मैदानातही विरोधकांना पराभूत करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अर्ज वैध ठरताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.