|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेसने नाकारलेल्यांना तिकीट यातच भाजपाचा पराभव

काँग्रेसने नाकारलेल्यांना तिकीट यातच भाजपाचा पराभव 

प्रतिनिधी/ सांगली

सांगलीचे नागरिक फसव्या भाजपाला स्वीकारत नाहीत, हे तिकीट वाटपानंतर दिसून आले. भाजपला गुंड-पुंड आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने नाकारलेले 60 टक्के  उमेदवार उभा करण्याची वेळ आली, यातच सर्वकाही आले अशी टीका काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी केली. महापालिकेच्या निवडणुकीत जयश्रीवहिनीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी  मोठा विजय मिळवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिकीटवाटप आणि छाननीनंतर ते अनौपचारिकपणे बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी चार वर्षीपूर्वी सांगली चांगली करतो असे गाजर दाखवले व आमदार खासदार पदरात पाडले. पण चारवर्षात काही केले नाही. ना सांगली चांगली झाली, ना स्मार्टमध्ये समावेश झाला, ना कृष्णा नदीचे शुध्दीकरणासाठी नमामी कृष्णा योजना झाली. शेतकऱयांना वाऱयावर सोडले. जकात एलबीटी निधी दिला नाही, धनगर, मराठा, आरक्षण दिले नाही. शेरीनाला प्रश्नी किरकोळ निधी दिला नाही. काहीही केले नाही. भाजपाला जनतेचे प्रश्न समजले नाहीत. सोडवता येत नाहीत, हे जनतेला आता समजले आहे. त्यामुळे भाजपाला तिकीट वाटपाला चांगले उमेदवारही मिळाले नाहीत. भाजपाने 78 उमेदवार दिले. पण, काँग्रेस राष्ट्रवादीने नाकारलेले, गुंड पुंड असे बाहेरचे उपरे 60 टक्के उमेदवार देण्याची नामुष्की राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या या पक्षावर आली असे  सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने चांगले जनतेला हवे असलेले उमेदवार दिल्याचा दावा त्यानी केला. पाटील म्हणाले, सांगली व काँग्रेस पक्षाची पक्की नाळ आहे. ती तिकीट वाटपाच्या वेळी पुन्हा दिसून आली. काँग्रेस आघाडी एकसंघतेने मैदानात उतरेल व दणदणीत संख्येने सत्ता राखेल असे सांगून ते म्हणाले प्रचारासाठी मी सर्वत्र फिरणार आहे, सभा घेणार आहे.

 भाजपाचे विकास माँडेल फसवे व बिनकामाचे आहे, हे नागपूर व मुंबईत एकाच पावसात दिसून आले अशी टीका करुन ते म्हणाले या सरकारने वसंतदादा जन्मशताब्दी व वसंतदादा स्मारकाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. निधी दिला नाही, बैठका घेतल्या नाहीत, नियोजन केले नाही. सांगलीला चार वर्षे बेदखल केले. हे लोकांना समजले आहे. भाजपाची नौका बुडणार हे स्पष्ट आहे. या नावेत बसायला कोणी तयार नाही, कोणी बसणार नाही असेही ते म्हणाले.