|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपनिरीक्षकपदी निवडीबद्दल सोनाली, रोशनी यांचा सत्कार

उपनिरीक्षकपदी निवडीबद्दल सोनाली, रोशनी यांचा सत्कार 

प्रतिनिधी / नागठाणे

नुकत्याच झालेल्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश संपादित करून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या सोनाली दत्तात्रय घाडगे (कामेरी) व रोशनी सुरेश साळुंखे (नागठाणे) यांचा बोरगाव पोलीस ठाण्यात नुकताच सत्कार सोहळा पार पडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या हस्ते यावेळी दोघींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सपोनि संतोष चौधरी म्हणाले, ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत उतरून व त्यात घवघवीत यश संपादित करून या दोन्ही मुलींनी या परिसरातील इतर विद्यार्थ्यांसमोर एक चांगला आदर्श उभा केला आहे. चाकोरीबद्ध शिक्षणाची पद्धत बदलून या मुली यशस्वी झाल्या, त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा, त्यांनी मिळविलेले हे यश नक्कीच कौतुकास्तद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या या  गुणवत्तेची दखल घेऊन पुढे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

नागठाणे पत्रकार संघातर्फेही सन्मान

याप्रसंगी सोनाली घाडगे व रोशनी साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नागठाणे विभाग पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन साळुंखे, माजी अध्यक्ष संभाजी चव्हाण, पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार भीमराव यादव, चंद्रकांत कुंभार, फरांदे, जाधव, माजी सरपंच बबनराव साळुंखे, पोलीस मित्र विजयसिंह घोरपडे यांच्यासह कामेरी व नागठाणेचे ग्रामस्थ होते. नागठाणे विभाग पत्रकार संघातर्फेही या दोघींचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक पोलीसपाटील सुहास काजळे यांनी केले.