|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 163 कोटी रोकड, 100 किलो सोने जप्त

163 कोटी रोकड, 100 किलो सोने जप्त 

‘ऑपरेशन पार्किंग मनी’अंतर्गत तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाची सर्वात मोठी कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्राप्तिकर विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मंगळवारी तामिळनाडूमधील एका रस्ते निर्मिती व दुरुस्ती कंपनीवर करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन पार्किंग मनी’अंतर्गत केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 163 कोटी रुपयांची रोकड आणि 100 किलो सोन्याची बिस्कीटे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार एसपीके अँण्ड कंपनीच्या कार्यालयांवर एकाचवेळी 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

कर चुकवेगिरीची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली. मात्र त्यांच्या हाती प्रचंड मोठे घबाड प्राप्त झाले आहे. चेन्नईमध्ये 17, अरुप्पुकोटई येथे 4 तर कोटपाडी परिसरातील एका ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकण्यात आले. ही कारवाई मंगळवारी सकाळी सुरु करण्यात आली असून बुधवारीही सुरु राहणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. कंपनीच्यावतीने अद्याप या रक्कमेविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून ही रक्कम बेहिशोबी असल्याचे आयकरच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.

एकाचवेळी 20 ठिकाणी छापे, 100 अधिकाऱयांचा सहभाग

राज्य महामार्ग विभागासाठी एसपीके अँण्ड कंपनी काम करते. नागराजन सेयादुराई हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. सोमवारी सकाळी चेन्नई, अरुप्पु कोटई, वेल्लूर आणि मदुराई येथे ही कारवाई करण्यात आली. 100 हून अधिक अधिकाऱयांनी कंपनीच्या 20 पेक्षा जास्त ठिकाणावर छापे टाकले. या कारवाई मोहिमेला ‘ऑपरेशन पार्किंग मनी’ हे नाव देण्यात आले होते. कार्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर ही कंपनी रस्ते देखभालीचे काम करत असल्याचीही नोंद आहे. कंपनीचे प्रवर्तक हे अण्णा दमुक पक्षाशी संबंधित असल्याचेही म्हटले जात आहे. राज्यातील महामार्गासंबंधित असणाऱया अनेक योजनांमध्ये ही कंपनी भागिदार आहे.

पार्किंग कारमधून रोकड जप्त

कंपनीकडून करचुकवेगिरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर चेन्नई विभागाने यासाठी ‘ऑपरेशन पार्किंग मनी’ ही मोहीम राबवली. कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात करचोरीची खात्री झाल्यानंतर ही कारवाई सुरु केली. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी लावण्यात आलेल्या अनेक कारमधून मोठमोठय़ा बॅगांमध्ये रोकड ठेवण्यात आली होती. ही सर्व रोकड अधिकाऱयांनी जप्त केली आहे. याशिवाय सोन्याची बिस्किटेही कारवाईत मिळून आली.

रोकड पाहून अधिकारी थक्क

रोकड आणि बिस्किटांची मोजदाद केल्यानंतर ही रोकड सुमारे 163 कोटी असल्याचे समजल्यावर अधिकाऱयांनाही धक्का बसला. तर जप्त केलेले सोनेही 100 किलोवर गेल्याने अधिकारी कंपनीच्या कारभाराविषयी अधिकच अचंबित झाले. याशिवाय अधिकाऱयांनी मोठय़ा प्रमाणात कंपनीशी संबंधित कागदपत्रे, संगणक, काही हार्ड डिस्क असे महत्त्वाचे दस्तऐवजही ताब्यात घेतले आहेत. यातून आणखी काही बेहिशोबी व्यवहार उघडकीस येऊ शकतील, असे मत या अधिकाऱयांनी व्यक्त केले आहे.

आणखी रोकड मिळण्याची शक्यता

आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 163 कोटींची रोकड जप्त केली आहे. शिवाय 100 किलो सोन्याची बिस्किटेही मिळाली आहे. ही सर्व मालमत्ता बेहिशोबी आहे. अजूनही माहिती घेऊन छापे टाकण्याचे काम सुरुच आहे. त्यातूनही आणखी मालमत्ता, रोकड, सोनेनाणे अशी मालमत्ता उघड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

देशातील सर्वात मोठी कारवाई

ही देशातील आजवरची सर्वांत मोठी कारवाई ठरली असल्याचा दावाही आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने केला आहे. याआधी चेन्नईमध्येच 2016 साली कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 110 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. खाण उद्योगाशी संबंधित उद्योजकांवर ती कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी काही राजकीय संबंध उघडकीस आले होते. यावेळी कंपनीचे राजकीय लागेबांधे असण्याची शक्यता असून अधिक तपासाअंती याबाबत माहिती उघड होण्याची शक्यताही या अधिकाऱयाने वर्तवली आहे.