|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेतून 16 विद्यमान नगरसेवक पुन्हा मैदानात

मिरजेतून 16 विद्यमान नगरसेवक पुन्हा मैदानात 

प्रतिनिधी/ मिरज

मनपासाठी शहरातील सहा प्रभागात अपवाद वगळता सर्वत्र चौरंगी लढत होत असल्याचे मंगळवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शहरातील 16 विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर सहा माजी नगरसेवकांनीही नशिब आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय अपक्षांचा भरणाही मोठा आहे. अपवाद वगळता काही प्रभागातील निवडणुका या लक्षवेधी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत.

आज मंगळवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील सहाही प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. याशिवाय विद्यमान 16 नगरसेवक पुन्हा नशिब आजमावित आहेत. यामध्ये काँग्रेसकडून गटनेते किशोर जामदार यांच्यासह विद्यमान स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, संजय मेंढे, बबिता मेंढे, सौ. धोंडूबाई कलगुटगी, राष्ट्रवादीकडून सौ. संगीता हारगे, अतहर नायकवडी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, मालन हुलवान हे पुन्हा निवडणूक मैदानात उतरले आहेत. याचवेळी भाजपाकडून सौ. शांता जाधव, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, माजी महापौर विवेक कांबळे, सौ. संगीता खोत निवडणूक मैदानात आहेत. अनिलभाऊ कुलकर्णी आणि अल्लाउद्दीन काझी या दोघांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.

माजी महापौर इद्रिसभाई नायकवडी, सौ.जयश्री कुरणे,  श्रीमती यास्मिन चौधरी, पांडुरंग कोरे, आनंदा देवमाने, अजित दोरकर हे सहा माजी नगरसेवकही पुन्हा मैदानात उतरले आहेत. याशिवाय सचिन जाधव, महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. प्रतीक्षाताई सोनवणे, प्रभाग पाचमध्ये श्रीमती जाहिदा पठाण,  स्वाभिमानी रिपाइंचे डॉ. महेशकुमार कांबळे हे न†िशब आजमावित आहेत.

शहरातील प्रभाग तीनमध्ये काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेत लढत होत आहे. सांगली जिल्हा सुधार समिती आणि आम आदमी पार्टीने एकत्रित येऊन काही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेनेही या प्रभागात मात्तब्बर उमेदवार देऊन कडवे आव्हान उभे केले आहे. अपक्षांचा भरणाही या प्रभागात लक्षणीय आहे. प्रभाग चार या एकमेव प्रभागात भाजपाचा अपक्षांशी सामना आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारच उभे केले नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. सुधार समितीने काही गटात उमेदवार उभे केले आहेत. तर काही अपक्षही येथे नशिब आजमावित आहेत. प्रभाग पाचमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रिपूर्ण लढत होत असली तरी, या लढतीकडे महापालिका क्षेत्राचे लक्ष आहे. येथे गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार विरुध्द माजी महापौर इद्रीस नायकवडी असा सामना आहे. भाजपा आणि शिवसेनेनेही प्रबळ दावेदार उभे करुन काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्हा सुधार समिती आणि अपक्षांची संख्याही येथे लक्षणीय आहे. श्रीमती जाहिदा पठाण यांनी याच प्रभागातून उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारीचीही आज जोरदार चर्चा झाली.

आघाडीत प्रभाग सहा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला आहे. आझम काझी यांना राष्ट्रवादीत घेऊन काँग्रेसची हवाच काढून घेण्यात आली होती. पण शेवटच्या क्षणी या प्रभागातून विद्यमान नगरसेवक अल्लाउद्दीन काझी यांनी राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केली. त्यांना शहराध्यक्ष साजिद पठाण यांनी समर्थन दिले. त्यामुळे एका गटासाठीची लढत लक्षवेधी झाली आहे. याशिवाय अन्य काही गटात एमआयएमच्या उमेदवारांचे आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. काही अपक्षही याच प्रभागातून नशिब आजमावित आहेत. प्रभाग सात हा काँग्रेसने आपल्याकडे घेतला आहे. येथे विद्यमान गटनेते किशोर जामदार मैदानात आहेत. भाजपाचे उद्योजक गणेश माळी यांना त्यांनी आव्हान दिले आहे. याशिवाय याच प्रभागात बसवेश्वर सातपूते, सौ. संगीता खोत, आनंदा देवमाने, गजेंद्र कुल्लोळी, सौ. धोंडूबाई कलगुटगी हे मैदानात उतरले आहेत. या प्रभागात भाजपा, काँग्रेसबरोबर जनता दलाचेही उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धनराज सातपूते पक्षाकडून अन्याय झाल्याने शेवटच्या क्षणी जनता दलाच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत. या प्रभागातही अपक्षांची संख्या मोठी आहे.

शहरातील 20 नंबर प्रभागात भाजपा आणि राष्ट्रवादीत लढत होण्याचे संकेत होते. पण आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि स्वाभिमानी रिपाइंने आपले उमेदवार मैदानात उतरविल्याने येथेही लक्षवेधी लढत होत आहे. माजी महापौर विवेक कांबळे, माजी नगरसेविका सौ. जयश्री कुरणे विरुध्द विद्यमान नगरसेविका सौ. संगीता हारगे, योगेंद्र थोरात यांच्यातील लढती लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी रिपाइंने डॉ. महेशकुमार कांबळे तर शिवसेनेने किरण कांबळे यांना मैदानात उतरवून विवेक कांबळे यांना आव्हान दिले आहे. एकंदरीत आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग चारचा अपवाद सोडला तर, सर्वच प्रभागात चौरंगी लढती होत आहेत.

Related posts: