|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ग्रामीण भागातील मंदिरे चोरटय़ांचे लक्ष्य

ग्रामीण भागातील मंदिरे चोरटय़ांचे लक्ष्य 

बेळगुंदी, सोनोलीतील मंदिरांमध्ये चोरी

वार्ताहर / किणये

बेळगुंदी गावातील दोन मंदिरांमध्ये व सोनोली येथील दुर्गादेवी मंदिरात चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सोने, चांदीचा हार आदींसह दानपेटी फोडून चोरटय़ांनी ऐवज लांबविला आहे. सोमवारी मध्यरात्री ही चोरी झाली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

एकाच रात्रीत बेळगुंदी-सोनोलीतील तीन मंदिरांमध्ये चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरटय़ांनी मंदिरे फोडली आहेत. चोरटय़ांनी आता मंदिरांना लक्ष्य केले आहे. बेळगुंदी येथील रवळनाथ व लक्ष्मी मंदिरात एकाच रात्री चोरी झाली आहे.

बेळगुंदी गावातील जागृत देवस्थान रवळनाथ मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून रवळनाथ मूर्तीवरील सुमारे 18 ते 20 तोळय़ांचा चांदीचा हार चोरटय़ांनी लांबविला. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पुजारी नामदेव गुरव पूजेसाठी आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चोरीची घटना ग्रामस्थांना समजताच ते रवळनाथ मंदिराकडे जमू लागले. याचवेळी लक्ष्मी मंदिरातही चोरी झाल्याचे समजले. 

लक्ष्मी मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून चोरटय़ांनी देवीच्या गळय़ातील दोन मंगळसूत्रे व इतर सोन्याचे दागिने लांबविले. सकाळी 10 च्या दरम्यान अनुसया विष्णू कोळी या पूजेसाठी आल्या होत्या. त्यावेळी मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बेळगुंदी गावातील दोन्ही मंदिरांमधील सुमारे 1 लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला आहे.

नामदेव गुरव, व्यंकट देसाई, नाना पाटील, सोमाण्णा गावडा, विठ्ठल गावडा, किशोर पाटील, अर्जुन शिंदे, यल्लाप्पा ढेकोळकर, ग्रा. पं. अध्यक्ष शिवाजी बोकडे, सुभाष हदगल, महादेव कोडले, देवाप्पा शिंदे आदींनी मंदिर परिसराची पाहणी केली.

सोनोली येथील जागृत देवस्थान असलेल्या दुर्गादेवी मंदिरातही चोरी झाली आहे. चोरटय़ांनी मंदिराच्या कंपाऊंडच्या दरवाजाची कडी व मंदिराचा दरवाजा फोडून गाभाऱयाच्या बाजूलाच असलेल्या दानपेटीतील रक्कम लांबविली आहे. सदर चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. पुजारी कल्लाप्पा पाटील पूजा करण्यासाठी गेले होते. यावेळी दानपेटी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीची माहिती समजताच यल्लाप्पा झंगरुचे, कल्लाप्पा झंगरुचे, वासुदेव पाटील, लक्ष्मण झंगरुचे, रामलिंग पाटील, ग्रा. पं. सदस्य सुनील झंगरुचे, यल्लाप्पा पाटील आदींसह ग्रामस्थ मंदिरात जमले होते.

 वडगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण स्वामी व त्यांच्या सहकाऱयांनी मंदिरांची पाहणी केली.

पुन्हा दुसऱयांदा चोरी

तीन महिन्यांपूर्वी सोनोली येथील दुर्गादेवी मंदिरात चोरी झाली होती. यावेळी आरती, घंटा व इतर साहित्य चोरटय़ांनी लांबविले होते. पुन्हा दुसऱयांदा चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस यंत्रणेकडून म्हणावी तशी कारवाई होत नसल्याचा आरोपही सोनोली ग्रामस्थांतून होत आहे.

हेस्कॉमच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष

बेळगुंदी-सोनोली ही गावे गेल्या आठ दिवसांपासून अंधारातच आहेत. खंडित वीज पुरवठय़ाने नागरिक वैतागून गेले आहेत. विजेचा लपंडाव सुरू आहे. सोमवारी रात्रीही वीजपुरवठा नव्हता. यामुळे अंधाराचा फायदा चोरटय़ांनी घेतला आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.  

Related posts: