|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरी विरोधात जोरदार निदर्शने

रिफायनरी विरोधात जोरदार निदर्शने 

डोंगरतिठा येथे आंदोलक एकवटले

रत्नागिरी, सिंधुदुर्गात हायवे रोखण्याचा इशारा

आंदोलनात सेना पदाधिकाऱयांचाही समावेश

 

प्रतिनिधी /राजापूर

तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध तीव्र करताना प्रकल्पग्रस्तांनी एकापाठोपाठ आंदोलन सत्र सुरू ठेवले आहे. नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, दादर येथे निदर्शने केल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा येथे मोठया प्रमाणात निदर्शने करण्यात आली. या विरोधाची दखल घेऊन प्रकल्प रद्द न केल्यास काही दिवसात रत्नागिरी सीमेपासून थेट बांदा पर्यंत महामार्ग रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असताना शासन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणार बाबत पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करून समृध्दीप्रमाणे चर्चा करण्याची भाषा करत असल्याचा आरोप आंदोलनकांनी केला. प्रकल्प विरोधकांनी विविध आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून आपला विरोध शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असतानाही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रथम नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, नंतर मुंबई दादर येथे निदर्शने झाल्यानंतर आता बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासूनच डोंगरतिठय़ावर प्रकल्पग्रस्त, शेतकरी व मच्छीमार मोठय़ा प्रमाणात जमा होऊ लागले. त्यानंतर 11 वाजल्यापासून निदर्शनांना सुरूवात झाली. सुमारे दिड तास चाललेल्या या निदर्शनांमध्ये उपस्थित जनतेतून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रकल्प विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

प्रकल्पाबाबत जनतेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची इच्छाच नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाला येथील जनतेचा सुरूवातीपासूनच विरोध आहे व आजही तो कायम आहे. हा प्रकल्प येथून रद्द करण्यात यावा या एकमेव मागणी शिवाय अन्य कोणतीही मागणी येथील जनतेची नाही. शासनाला हा विरोध कळत नसेल तर भविष्यात प्रकल्पाविरोधात उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, ओंकार प्रभुदेसाई, सचिव भाई सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य तसेच शिवसेनेचे नूतन राजापूर तालुका संपर्कप्रमुख व अवजड वाहतूक सेनेचे कोकण विभाग महाराष्ट्र राज्य सचिव दिनेश जैतापकर, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख, राजापूर सभापती अभिजीत तेली, जि.प.सदस्य दिपक नागले आदी सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

….तर महामार्ग रोखणार ः सामंत

येथील प्रकल्पग्रस्तांची प्रकल्प रद्द ही एकच जिद्द आहे. शासनाने या मागणीचा विचार करून प्रकल्प रद्द करावा. अन्यथा येत्या काही दिवसात मुंबई गोवा महामार्गावरील खेड बाजूकडील रत्नागिरी सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बांदा पर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विधान परिषदेचे अधिवेशन संपल्यानंतर रास्ता रोकोचे नियोजन व तारीख नक्की केली जाणार असल्याची माहिती अरविंद उर्फ भाई सामंत यांनी दिली.

Related posts: