|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भीषण अपघातात रिक्षाचालक ठार

भीषण अपघातात रिक्षाचालक ठार 

साडवलीनजीक मॅजिक टेम्पोची धडक

सहा जखमी, तिघे गंभीर

प्रतिनिधी /देवरुख

देवरुख-संगमेश्वर मार्गावर साडवली येथील वनाझ कंपनीनजीक टाटा मॅजिक टेम्पो व रिक्षाची समोरा समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक राजेंद्र उर्फ पप्या वेल्हाळ (देवरुख) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहाजण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी दुपारी 2.45 च्या सुमारास हा अपघात झाला.

देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र यशवंत वेल्हाळ (48, रा. देवरुख) हे रिक्षा घेवून संगमेश्वरवरुन देवरुखच्या दिशेने येत होते. तर मयुरेश गणेश सरफरे (23, रा.सांगवे) हे देवरुखवरुन कोसुंबच्या दिशेने निघाले होते. साडवली येथील वनाझ कंपनीनजीक या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात रिक्षा चालक राजेंद्र वेल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त रिक्षामध्ये चार प्रवासी तर मॅजिक टेम्पोमध्ये दोन विद्यार्थी होते. रिक्षामधील सुभाष तानाजी मेस्त्राr (43, परचुरी), वसंत धोंडू कळंबटे (50, परचुरी), प्रविण जयपाल देसाई (30, नारंदे-कोल्हापूर), गणेश प्रकाश जाधव (26, साडवली) तर मॅजिक टेम्पो चालक मयुरेश सरफरे, हर्ष देवेंद्र शेलार (9, सांगवे) हे जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील सुभाष मेस्त्राr, वसंत करंबेळे, प्रविण देसाई यांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. हा मॅजिक टेम्पो बेकरीच्या साहित्याची वाहतुक करत होता. देवरुखमधून माल सोडून हा टम्पो परत सांगवे येथे निघाला होता. यामध्ये चालक मयुरेश यांची नातेवाईक असलेली दोन शाळेची मुले होती. त्यापैकी हर्ष याला तोंडाला किरकोळ दुखापत झाली. तर रिक्षाचालक राजेंद्र उर्फ पप्या हा संगमेश्वर रेल्वेस्थानकात भाडे सोडून परत देवरुखच्या दिशेने येत होता. यावेळी संगमेश्वर बस स्थानकातून चार प्रवासी त्यांनी घेतले होते.

हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अपघतानंतर रिक्षाचा समोरील भाग चेपला गेल्याने सर्व प्रवासी आतमध्ये अडकून होते. त्यांना पत्रा बाजुला करून बाहेर काढण्यात आले. राजेंद यांचे दोन्ही पाय पत्र्यामध्ये व एक हात स्टेरिंगमध्ये अडकून राहिला होता. त्यांना मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पी. डी. कदम, संतोष सडकर, प्रशांत शिंदे, जे. एस. तडवी, डी. एस. पवार यांनी जावून पंचनामा केला. माजी आमदार सुभाष बने, जि. प. सदस्य रोहन बने उपस्थित होते.

स्कूल बसच्या अपघाताची अफवा

हा अपघात झाल्यानंतर लगेचच याचे वृत्त सोशल मिडियावर रंगले. यामध्ये स्कुल बसचा अपघात झाला असे टाकण्यात आले होते. यामुळे पालकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. या चुकीच्या वृत्तामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.