|Monday, October 15, 2018
You are here: Home » क्रिडा » लंका-द. आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

लंका-द. आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून 

वृत्तसंस्था /कोलंबो :

यजमान श्रीलंकेविरुद्ध दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात निर्धाराने विजय खेचून आणत मालिकेत बरोबरी साधणे, हाच दक्षिण आफ्रिकन संघासमोरील एकमेव पर्याय असेल. उभय संघात आजपासून (दि. 20) येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर ही लढत खेळवली जाईल. यापूर्वी, दोन्ही संघ पहिल्या कसोटीत आमनेसामने भिडले, त्यावेळी लंकेने 278 धावांनी दणकेबाज विजय संपादन केला होता. तीच घोडदौड येथेही कायम ठेवण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.

यापूर्वी दर्जेदार फिरकी गोलंदाजीचा बीमोड करण्यात दक्षिण आफ्रिकन संघाला चांगलेच अपयश आले आणि त्यांचे सारे तंत्रच उघडय़ावर पडले होते. गॅलेतील त्या कसोटीत विशेषतः रंगना हेराथ व त्याच्या सहकाऱयांनी आफ्रिकेचा अक्षरशः धुव्वा उडवला. आफ्रिकन फलंदाज अजिबात आत्मविश्वासाने खेळले नाहीत, याचा त्यांना फटका बसला. आता शेवटच्या कसोटीतही त्यांना आपल्याच कर्णधाराच्या पलीकडेही पहावे लागेल, हे स्पष्ट आहे.

फॅफ डय़ू प्लेसिसने यापूर्वी पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात चेंडूवर अगदी तुटून पडणे टाळले. शिवाय, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वेळप्रसंगी आदरही दाखवला. पण, त्याचा अपवाद वगळता अन्य आफ्रिकन फलंदाजांनी मात्र सपशेल लोटांगण घातले. एबी डीव्हिलियर्ससारखा महान खेळाडू निवृत्त झाल्यानंतर त्याची पोकळी आफ्रिकन संघाला जाणवत असल्याचे पहिल्या कसोटीत प्रकर्षाने दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर, आता आफ्रिकन संघ लंकेविरुद्ध कशी लढत देणार, हे पहावे लागेल.

आफ्रिकेला त्या तुलनेत गोलंदाजीत मात्र फारशी चिंता नाही. कॅगिसो रबाडा आताही प्रतिस्पर्धी फलंदाजी लाईनअपमध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी करु शकतो. शिवाय, केशव महाराजचे गोलंदाजीतील वैविध्य व अचूकता कोणत्याही क्षणी पेचात टाकू शकते. तबरेझ शम्सी हा केशवला कशी साथ देईल, यावर आता आफ्रिकन संघव्यवस्थापनाचे लक्ष असेल.

यापूर्वी, पहिल्या कसोटीत लंकेने एकतर्फी विजय संपादन केला असला तरी फलंदाजीत त्यांच्यासाठी फारशी आश्वासक स्थिती राहिलेली नाही. त्यांचा दिमुथ करुणारत्ने हाच एकमेव सध्या उत्तम बहरात असून मागील 5 सामन्यात त्याने 448 धावा जमवल्या आहेत. यात लंका अ संघातर्फे खेळलेल्या दोन डावांचाही समावेश आहे. पण, द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात दुसऱया क्रमांकांची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 26 इतकीच होती आणि त्यांच्या 11 व्या अर्थात शेवटच्या फलंदाजाने पुढील सर्वोत्तम धावा केल्या, ही आणखी धक्का देणारी बाब ठरली.

त्यांच्या अगदी दुसऱया डावातही केवळ तीनच फलंदाजांनी 20 धावांचा टप्पा सर केला. घरच्या मैदानावर खेळताना फलंदाजीतील अशी ससेहोलपट लंकेसाठी निश्चितच मानवणारी नव्हती. एसएससीवरील खेळपट्टी गॅलेपेक्षाही फलंदाजीला अधिक पोषक असते. त्या पार्श्वभूमीवर लकमल आणि कंपनीसाठी ही नामी संधी ठरु शकते. हेराथ व दिलरुवन परेरा या फिरकीपटूंवरच लंकेची आणखी एकदा भिस्त असेल, हे देखील स्पष्ट आहे.

Related posts: