|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दूध संकलन ठप्पच, आता चक्काजाम

दूध संकलन ठप्पच, आता चक्काजाम 

प्रतिनिधी /निपाणी :

महाराष्ट्रात दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारपासून दूधबंद आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनात सीमाभागातील दूध संस्था व दूध उत्पादकांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे निपाणी परिसरातही चार दिवसांपासून लाखो लीटर दुधाचे संकलन ठप्प झाले आहे.

सदर आंदोलनाचा एक भाग म्हणून किणी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये निपाणी परिसरातील अनेक कार्यकर्ते व दूध उत्पादकांनीही सहभाग घेतला. दूध बंद आंदोलनामुळे निपाणी परिसरातही सुमारे 400 ते 500 दूध संस्था 4 दिवसांपासून बंद आहेत. याचा दूध उत्पादकांनाही फटका बसत असला तरी गायीच्या दुधाला अत्यल्प दर मिळत नसल्याने दूधबंद आंदोलन नाईलाजास्तव हाती घ्यावे लागले आहे. सुरुवातीचे दोन दिवस कर्नाटकातून महाराष्ट्रात होणारा दूध पुरवठा पूर्णपणे ठप्प होता.

मात्र बुधवारपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया दूध टँकरना पोलीस संरक्षण दिले जात आहे. यासाठी निपाणी पोलिसांतर्फे मुरगूड रोड, यमगर्णीनजीक सहारा हॉटेल, मांगूरफाटा व कोगनोळी टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. येथे येणाऱया दूध टँकरना महाराष्ट्र हद्दीपर्यंत जाण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जात आहे. दरम्यान, आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार निपाणी परिसरात घडू नये यासाठी निपाणी पोलीस तैनात झाले आहेत.