|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आरटीओ पासिंग ट्रकसाठी पालिकेने निधी द्यावा

आरटीओ पासिंग ट्रकसाठी पालिकेने निधी द्यावा 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

 वाहन पासिंग ट्रकसाठी पंचवटी चित्रमंदिराजवळील जागा देण्यास कसलीही हरकत नाही. पण पूर्ण क्षमतेने पासिंग ट्रक सुरु होण्यास कालावधी लागणार आहे. तो तात्काळ सुरु होण्यासाठी आवश्यक 60 लाख रुपये नगरपरिषदेने वैशिष्टय़पूर्ण योजनेतून द्यावेत. त्याचबरोबर क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्राची इमारत व जागा प्रादेशिक परिवहन विभागाला कॅम्प सुरु करण्यासाठी कायमस्वरुपी नाममात्र भाडय़ाने द्यावी, अशी मागणी रिक्षा चालक-मालक, मालवाहतूक टेम्पो कृती समितीच्यावतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली या मागणीचे निवेदन कृती समितीच्यावतीने नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी व मुख्याधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले.

       यावेळी बोलताना मंत्री आवाडे म्हणाले, इचलकरंजी येथील रिक्षा, मालवाहतूक टेम्पोची संख्या सुमारे 12 हजारच्या आसपास आहे. या सर्वच वाहनांना कोल्हापूर येथे पासिंगसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील रिक्षा, मालवाहतूक टेम्पोसह वाहनांच्या पासिंग ट्रकचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी पंचवटी चित्रमंदिर समोरील जागा नगरपालिकेने प्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्याबाबतचा ठराव गुरुवार 26 जुलै रोजी होणाऱया पालिकेच्या सर्वसाधारण   सभेत अजेंडयावर घेतला आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध असणार नाही. मात्र यासाठी आवश्यक असणारा 60 लाख रुपयांचा निधी शासनाच्या नियोजन मंडळाकडून उपलब्ध होऊन संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होण्यास सात ते आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत वाहनधारकांना कोल्हापूरलाच जाणे भाग पडणार आहे. त्यासाठी या निधीची प्रतिक्षा न करता नगरपरिषदेने आवश्यक 60 लाखाचा निधी वैशिष्टय़पूर्ण योजनेतून उपलब्ध करुन द्यावा. शहरात आरटीओ कॅम्प आता आठवडय़ातील पाच दिवस सुरु राहणार आहे. हा कॅम्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहापूर गेस्ट हाऊसमध्ये घेतला जातो. मात्र ती जागा तात्पुरती आहे.  यासाठी लालनगर परिसरातील क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्राची अंदाजे 55 हजार चौरस फुट कंपाऊंड असलेली जागा व त्यावर 15 हजार चौरस फुट बांधकाम असलेली इमारत प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी नाममात्र भाडय़ाने देण्यात यावी. त्यामुळे भविष्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याचे झाले तर इचलकरंजी शहराला निश्चितपणे प्राधान्य मिळेल. या दोन्ही विषयांचे ठराव गुरुवारी होणाऱया नगरपरिषदेच्या सभेत सर्वानुमते मंजूर करावेत असे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र रिक्षाचालक मालक संघटनेचे दशरथ मोहिते, अशोक कोलप, नंदा साळुंखे, शाहू ग्रुप मालवाहतूक कृती समितीचे  प्रकाश लोखंडे, साताप्पा आदमापुरे, पांडुरंग माने, इसाक आवळे, विद्यार्थी रिक्षा वाहतूक संघटनेचे सचिन मस्के, मन्सुर सावनुरकर, अनिल बमण्णावर, इंदिरा ऑटो युनियनचे लियाकत गोलंदाज, शाहीर जावळे, जीवन कोळी, एस. टी. स्टॅण्ड रिक्षा मित्र मंडळाचे आण्णा पांडव, मोहन भिसे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सुनिल पाटील, विठ्ठल चोपडे, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश पाटील, नितीन कोकणे, सौ. बिलकिस मुजावर आदींसह रिक्षा, टेम्पोचालक उपस्थित होते.

Related posts: