|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जोवरि पैसा तोवरि बैसा

जोवरि पैसा तोवरि बैसा 

तानीन्दियाणि सकलानि तदेव कर्म

सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव ।

अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव

त्वन्यः क्षणेन भवतीति विचित्रमेतत् ।।

अन्वय – (कस्यचन पुरुषस्य) इन्दियाणि तानि एव

(यथापूर्वं) भवन्ति, कर्म (अपि) तद् एव भवति

(तस्य) अप्रतिहता बुद्धिः सा एव भवति,

(तथा) वचनमपि (पूर्ववत) तद् एव अस्ति,

अर्थोष्मणा विरहितः पुरुषः सःएव

अस्ति  (किंतू अर्थोष्मविरहेन) क्षणेन

अन्यः (एव) भवति, इति एतत् विचित्रय ।

अनुवाद:(एखाद्या व्यक्तीची) सारी इंद्रिये तीच (पूर्ववत) असतात. त्याचे कामही पूर्वीसारखे तेच असते. ती पुंठित न होणारी त्याची बुद्धीही तशीच असते. त्याचे बोलणेही (पूर्वीसारखे) तसेच असते. ‘पैशाची ऊब गमावलेला (निर्धन) माणूसही तोच असतो. (परंतु निर्धनतेमुळे) क्षणात तो कुणी वेगळाच बनतो. हे आश्चर्यकारक आहे.

विवेचन : धनवान व्यक्ती निर्धन बनली, त्याची पैशाची ऊब नाहीशी झाली की तो वेगळाच कुणीतरी बनतो, असे सुभाषितकार म्हणतो. वस्तुतः त्याचे व्यक्तिमत्त्व, वागणे, बोलणे, काम, त्याची हुशारी ही सारी वैशिष्टय़े तशीच असली, तरी माणूस वेगळाच होतो, म्हणजे वस्तुतः लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. त्यामुळे वागण्याची पद्धतही बदललेली असते.

सुभाषितकाराला हे विचित्र वाटते. पण ते तसे नाहीच, कारण दुसऱया एका सुभाषितात, सर्व गुण सोन्याचा (संपत्तीचा) आश्रय घेऊनच असतात. पैसेवालाच कुलीन, विद्वान, गुणग्राहय़, वक्ता, भारदस्त असतो असे सांगितलेच आहे. (सर्वे गुणाः कांचनमाश्नयनो) या उलट, संपत्ती नसेल तर त्याचे सामर्थ्य उणावते. दुसऱयाला आर्थिक वा इतर मदत करणे त्याला शक्मय होत नाही. आधार घेण्यासाठी तो अयोग्य ठरतो. थोडक्मयात, तो इतरांच्या दृष्टीने निरुपयोगीच ठरतो. त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. पाहूनही न पाहिल्यासारखे करतात. यामुळे वैतागलेला एक माणूस आपल्या दारिद्रय़ालाच नमस्कार करतो. म्हणतो हे दारिद्रय़ा तुझ्यामुळेच मला (अदृश्य होण्याची) सिद्धी प्राप्त झाली आहे. मी सारे जग पाहतो, पण मला मात्र कुणीच पहात नाही! काय जळजळीत उपहास आहे पहा या बोलण्यात! अर्थात पैशाची ऊब नाहीशी झाल्यानंतर माणूस कःपदार्थच बनतो, आणि अशी परिस्थिती निर्माण होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. ‘जोवरि पैसा, तोवरि बैसा’ अशी एक म्हणच मराठीत आहे, ती सार्थ आहे.

Related posts: