|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडीत ‘ऑनलाईन एज्युकेशन’चे लोकार्पण

वैभववाडीत ‘ऑनलाईन एज्युकेशन’चे लोकार्पण 

राज्यातील पहिलाच उपक्रम – राऊत

तालुक्यातील 22 प्राथमिक, माध्यमिक शाळांचा सहभाग

जिल्हय़ात अधिकाधिक शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वच

शाळांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करणार-विनायक राऊत

प्रतिनिधी / वैभववाडी:

शिक्षणातील आधुनिकीकरण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी आवश्यक आहे. ‘ऑनलाईन एज्युकेशन’ त्याचाच एक भाग आहे. तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक अशा 22 शाळांमध्ये ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. अशाप्रकारे उपक्रम सुरू होत असलेला वैभववाडी हा महाराष्ट्रातील पहिला तालुका असल्याचे गौरवोद्गार खासदार विनायक राऊत यांनी येथे काढले. दरम्यान, पालकांचीही महिन्यातून एक परिपूर्ण शाळा भरवावी. शाळा, विद्यालयात अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब कसा केला जातो, याची माहितीही पालकांना व्हावी, असे त्यांनी सांगितले.

खासदार राऊत यांच्या संकल्पनेतून केंद शासनाच्या मानव विकास कार्यप्रमांतर्गत तालुक्यातील 22 शाळांमध्ये दूरसंचार ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा येथील अर्जुन रावराणे विद्यालयात खासदार राऊत यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, दूरसंचार विभागाचे उपमहाप्रबंधक मिलिंद क्षिरसागर, सभापती लक्ष्मण रावराणे, जि. प. चे शिवसेना गटनेते नागेंद्र परब, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जयेंद्र रावराणे, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, मधुकर राऊत, सुनील गिरी, रमेश तावडे, नंदू शिंदे आदी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, शासन आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्हा कोणत्याच गोष्टीत मागे राहणार नाही. तालुक्याला मिळालेल्या या ऑनलाईन एज्युकेशनसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह व विद्यमान अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचेही योगदान मोठे आहे. या उपक्रमाचा स्वीकार कसा करायचा व त्याचा लाभ विद्यार्थ्यांना कसा द्यायचा हे समजणे महत्वाचे आहे, याची माहिती पालकांनाही असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

झारापमध्ये साकारणार मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र

किती शिकलो, याच्यापेक्षा काय शिकलो, हे महत्वाचे आहे. मी खासदार म्हणून जनतेला काय देऊ शकतो, याची जाण असणे आवश्यक असल्याचा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट कनेक्टीव्हीटी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही दाखल्यांसाठी जनतेला गावाबाहेर जाण्याची गरज लागणार नाही. जिल्हय़ात अधिकाधिक शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सर्वच शाळांना हा प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच कुडाळ तालुक्यातील झाराप येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवाय नव्याने उभे केलेले मोबाईल टॉवरही लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईनसाठी ‘दूरसंचार’मध्ये सुधारणा आवश्यक

आमदार नाईक म्हणाले, वैभववाडी तालुका शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत होत चालला आहे. स्पर्धेच्या युगात येथील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी सर्व शैक्षणिक सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राबविताना दूरसंचार यंत्रणा कोलमडली आहे. त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.