|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली सुन्न!

दापोली सुन्न! 

पोलादपूरजवळ बस दरीत कोसळून 33 ठार

बस 700 फूट खोल दरीत

एकमेव प्रवासी बचावला

गाडीचा पूर्ण चेंदामेंदा

प्रतिनिधी /दापोली, खेड

अत्यंत उत्साहाने अभ्यास दौऱयासाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोली कृषी विद्यापिठाच्या 33 कर्मचाऱयांचा शेवट 700 फुट खोल दरीत होण्याच्या घटनेने अवघी दापोली सुन्न झाली आहे. या मृत्यूच्या तांडवाने अवघे राज्य हादरून गेले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱयांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कोसळून एकमेव प्रवाशाचा अपवाद वगळता सर्वाना प्राण गमवावे लागले. मदत कार्य सुरू असून सायंकाळी उशीरापर्यंत केवळ 17 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.

कोकण कृषी विद्यापीठाचे 34 कर्मचारी विद्यापिठाच्या बसने विंरगुळा व गहु संशोधन केंद्राला भेट देण्यासांठी महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी साडसहा वाजता कृषी विद्यापीठातून बस रवाना झाल्यानंतर काही तासांतच पोलादपूर येथील आंबेनळी घाटात बस सुमारे 700 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये बसचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून फक्त एकच व्यक्ती यामध्ये वाचली आहे. या अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांनी बस चिखलात सरकल्यामुळे हा अपघात झाल्याने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या अपघातात 33 जण प्राणास मुकल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.

दैव बलवत्तर….

या बसची अवस्था पाहता यातील कोणीही प्रवासी बचावण्याची अजिबात शक्यता नाही. मात्र प्रकाश सावंत-देसाई यांचे दैव बलवत्तर म्हणून गाडी दरीत कोसळत असतानाच ते बाहेर फेकले गेले. दरीत घसरत जात असताना जे हाताला सापडेल ते पकडण्याच्या प्रयत्नात एका झाडाची फांदी हाती लागल्याने ते बचावले. डोळय़ासमोर बस दरीत कोसळत असताना केवळ पाहण्यापलीकडे ते काहीही करू शकले नाहीत. यानंतर ते कसेबसे रस्त्यावर आले. रस्त्यावरून जाणाऱया एका वाहनाला थांबवून त्यांनी मदत मागितली. त्या वाहनचालकाने आपला मोबाईल सावंत-देसाई यांना दिला. त्या फोनवरून त्यांनी अपघाताची माहिती विद्यापीठातील आपल्या मित्राला व दापोली पोलीस स्थानकाला कळवली. केवळ त्यांनी कळवल्यामुळेच अपघाताची माहिती समजू शकली.

यंत्रणा दाखल

दापोली पोलीसांकडून पोलादपूर व सातारा पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती कळवण्यात आली. तातडीने या दोन्ही ठिकाणची पोलीस यंत्रणा घटनास्थळाकडे रवाना झाली. महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. पालकमंत्री, आमदार यांच्यासह अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळ गाठले. ट्रेकर्सनी लगबगीने दोऱया बांधून दरीकडे धाव घेत बचावकार्य सुरु केले.

हवामानाचा अडसर

ट्रेकर्सनी दरीत उतरण्यास सुरुवात केली मात्र पाऊस, जोरदार धुके यामुळे वारंवार अडथळे येत होते. त्यातच अपघातस्थळी केवळ बघ्यांची व गाडय़ांची गर्दी वाढू लागल्याने बचावकार्यात अडथळे वाढू लागले. अखेर या घाटातील वाहतूक थांबविण्यात आली. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही याकामी पोलिसांना सहकार्य केले. त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या व वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अखेर टप्प्या-टप्प्याने 4-5 गाडय़ा एकेरी मार्गाने सोडण्यास सुरुवात झाली. ट्रेकर्सना गाडीचा पुरता चेंदामेंदा झाल्याचे व मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत इतस्ततः फेकले गेल्याचे आढळले. अशा काळीज कापून काढणाऱया परिस्थितीतही ट्रेकर्सनी आपले कार्य नेटाने सुरु केले.

मृत्यूने गाठलेच

ट्रेकर्सकडून प्रारंभी जखमींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. अपघातग्रस्त गाडीजवळ कळवळणारी एक व्यक्ती आढळून आल्याने त्याला तातडीने दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात आले. वर यईपर्यंतच त्याची हालचाल थांबली होती. त्याला तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत मृत्यूने त्याला गाठले होते. त्यानंतर मात्र ट्रेकर्सना एकाही जीवंत व्यक्तीचा सुगावा लागला नाही. प्रतिकूल हवामानावर मात करत ट्रेकर्सनी दोरखंडाच्या साहाय्याने एकेक मृतदेह दरीबाहेर काढण्यास सुरूवात केली. हे देह तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते.

अधिकारी रवाना

दरवर्षी विद्यापीठातील क्लेरिकल व अन्य स्टाफ पिकनिकसाठी जातो. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता विद्यापीठाच्या आवारातून पिकनिकसाठी बस निघाली. त्यावेळी फोटोही काढण्यात आला. त्या फोटोमध्ये 32 कर्मचारी दिसत असून अन्य दोघे चालक आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे संचालक डॉ. संजय भावे यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाला सकाळी साडेदहा वाजता या अपघाताची माहिती मिळाली. अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत-देसाई यांनी यांनी फोन करून माहिती दिल्यानंतर वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.

बघ्यांची गर्दी आणि पाऊस

ग्रामस्थांनी बस दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलादपूर आणि साताऱयातील सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. महाबळेश्वर येथील ट्रकर्सना बोलावून हे बचाव कार्य सुरू आहे. मात्र मुसळधार बरसणारा पाऊस आणि बघ्यांनी केलेली तुफान गर्दी यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण येत होते.

दापोली बंद

अपघाताचे वृत्त येताच रत्नागिरीवर शोककळा पसरली आहे. दापोलीत सर्वच बाजारपेठा बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

राहुल यांनी व्यक्त केला शोक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अपघाताबद्दल ट्विटरच्या माध्यमातून तीव्र शोक व्यक्त केला असून अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

4 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्य सरकार मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.

33 जणांची अखेरची सफर

या अपघातात दोन चालकांसह 33 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी, प्राध्यापक संशोधन करणारे विद्यार्थी यांचाही समावेश आहे. अपघातात राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिगवण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिम्हवणेकर, राजेंद्र रिसबूड, सुनील साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रवीकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ यांचा मृत्यू झाला.