|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासळी खवय्यांना प्रतीक्षा 1 ऑगस्टची

मासळी खवय्यांना प्रतीक्षा 1 ऑगस्टची 

प्रतिनिधी /पणजी :

फॉर्मेलीनच्या दहशतीमुळे मासळी आणि मासळी मार्केटकडे पाठ फिरविलेल्या गोव्यातील मत्स्यपेमींना आता 1 ऑगस्टची प्रतीक्षा आहे. गोव्यातील मच्छिमारी ट्रॉलरमधून येणाऱया मासळीची प्रतीक्षा आता गोमंतकीयांना आहे. मागील 15 दिवस गोव्यातील मासळी खवय्यांनी मासळीकडे पाठ फिरविली आहे.

फॉर्मेलिनमुळे मासळीची मोठी धास्ती सध्या गोमंतकीयांनी घेतली आहे. 12 जुलै रोजी मडगाव घाऊक मार्केटमध्ये फॉर्मेलिनचा प्रकार उघडकीस आला होता. मडगाव मार्केटमध्ये छाया मारलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी प्रथम मासळीमध्ये फॉर्मेलिन असल्याचे जाहीर केले. त्यानंतर संध्याकाळी परमीसीबल लिमीटमध्ये फॉर्मेलिन असल्याचे जाहीर केले. मात्र त्या दिवसापासून मासे खवय्यांनी मासळी संदर्भात घेतलेली धास्ती अद्याप कमी झालेली नाही.

फॉर्मेलिनची धास्ती एवढी प्रचंड आहे की हॉटेल व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. विधानसभेत खुद्द हॉटेलमालक असलेले उपसभापती मायकल लोबो यांनी हा प्रकार सांगितला. हॉटेलमध्ये मासळी उपलब्ध असली तरी ग्राहक मासे मागत नाही. मार्केटमधून आणलेले मासे फेकून द्यावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सर्वच हॉटेलमध्ये हाच प्रकार सुरू आहे. संपूर्ण गोव्यानेच फॉर्मेलिनची धास्ती घेतली आहे. गोव्यातील लोकांनाही मासे खाणे कमी केले आहे. अंडी, गावठी मासळी, खेकडे व भाजीपाला यावरच आता गोव्यातील लोकांचे जेवण अवलंबून आहे.

प्रतीक्षा 1 ऑगस्टची

गेले पंधरा दिवस कळ सोसलेल्या लोकांना आता प्रतीक्षा आहे ती 1 ऑगस्टची. राज्यात मच्छीमारी बंदी काळ 31 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. 1 ऑगस्टला मच्छीमारी ट्रॉलर समुद्रात जातील व त्यानंतर गोव्यात ताजी मासळी उपलब्ध होणार आहे. ट्रॉलरही समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सज्ज आहेत. मात्र फॉर्मेलिनच्या धास्तीने गेले. पंधरा दिवस मासळीकडे पूर्ण पाठ फिरविली आहे.