|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद

खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद 

ऑनलाईन टीम / पुणे :

खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

धरण परिसरातील चौपटीवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाडय़ांमुळे इथे मोठय़ा प्रमाणात ट्रफिक जाम होत आहेत. याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे अखेर प्रशासनाने रविवारी या चौपाटय़ा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात काही ठिकाणी जलसमाधी आंदोलन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, अशी शंका घेतली जात होती. पण फक्त वाहतुकीच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेतला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, खडकवासला धरणामधून गाळ काढण्याचे काम पुण्यातील ग्रीन थंब या संस्थेने 2011 साली सुरू केले. या प्रयत्नांना आता यश आले असून आतापर्यंत सुमारे 15 लाख ट्रक एवढा गाळ या संस्थेकडून काढण्यात आला. या गाळाचाच वापर करून धरण परिसराचे सुशोभीकरण केले आहे. आता हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. गाळ काढल्यामुळे धरणाची पाणी ग्रहण करण्याची क्षमताही वाढली आहे. ग्रीन थंबकडून वृक्षारोपणाचाही प्रकल्प या भागात राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत या परिसरात त्यांनी चार लाखांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. आजही माजी सैनिकांच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आले. या हंगामात एक लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्याचा ग्रीन थंबचा मानस आहे.