|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आता ‘एक गाव, एक पोलीस’

आता ‘एक गाव, एक पोलीस’ 

दैनंदिन कामाबरोबरच अतिरिक्त जबाबदारी : पोलिसांवरचा ताण वाढणार

संतोष सावंत / सावंतवाडी:

गावागावातील इत्यंभूत माहिती गृह विभागाला तात्काळ मिळणार आहे. यासाठी गृह विभागाने संपूर्ण राज्यातील जिल्हानिहाय प्रत्येक गावात एक पोलीस नियुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून गावनिहाय एक पोलीस रुजू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील दैनंदिन काम सांभाळून पोलिसांना गावची जबाबदारी हाताळावी लागणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढणार आहे.

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे होमपीच असलेल्या सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 42 गावांत एक पोलीस नियुक्त करण्यात आला आहे. ‘एक गाव एक पोलीस’ योजनेत नेमणूक झालेल्या पोलिसांनी आपली जबाबदारी सांभाळली असून गावातील अप्रिय घटना तसेच गावगुंडांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या गृह विभागाने ‘एक गाव एक पोलीस’ संकल्पना हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र वाढती आंदोलने, दंगली, अत्याचार, लूट या घटनांमुळे गृहविभागाने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातील एखादी घटना तात्काळ काही सेकंदात गावात पोहोचते. त्याचे बरे-वाईट परिणाम होतात. त्यामुळे गृहखात्याने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत.

एक गाव एक पोलीस तैनात

गृह विभागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. तर गृहराज्यमंत्रीपद दीपक केसरकर सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या कल्पकतेतून एक गाव एक पोलीस योजना जुलै महिन्यापासून काटेकोरपणे राबविण्याचे ठरविले आहे. गेल्या 20 जुलैपासून राज्यातील प्रत्येक जिल्हानिहाय पोलीस अधिकाऱयांना गाव तेथे पोलीस नियुक्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्हय़ातील आठही तालुक्यातील पोलीस ठाण्यांना त्या-त्या भागात गावनिहाय एक पोलीस नियुक्त करण्याचे आदेश काढले आहेत.

सावंतवाडी तालुका आघाडीवर

सावंतवाडी पोलीस ठाण्यात सावंतवाडी शहर, आरोंदा, आंबोली, मळेवाड, माडखोल, तळवडे, चराठे, कोलगाव बीट आहेत. या बीटनिहाय बीट हवालदार नियुक्त आहेत. परंतु आता एक गाव एक पोलीस योजनेनुसार सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत 42 गावांमध्ये प्रत्येकी एका पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यात बांदा पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही ‘एक गाव एक पोलीस’ नियुक्ती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी 1 ऑगस्टपासून एक गाव एक पोलीस डय़ुटी निश्चित केल्या आहेत.

दुहेरी जबाबदारी

एक ऑगस्टपासून जिल्हय़ात प्रत्येक गावात एक पोलीस डय़ुटीवर असणार आहे. हा पोलीस त्या गावातील इत्यंभूत माहिती आपल्याकडे ठेवणार आहे. तसेच गावात काही घडल्यास तात्काळ भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार आहे. गावातील लोकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेणार आहेत. तसेच गावात पुरुष, महिला, तरुण यांची यादी करून ‘पोलीस मित्र’ म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. ‘एक गाव एक पोलीस’ डय़ुटीमुळे त्या नियुक्त केलेल्या पोलिसाला पोलीस ठाण्यातील नित्याचे काम आणि जबाबदारी दिलेल्या गावाची माहिती, अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या नव्या योजनेमुळे पोलिसांवरील ताण वाढणार आहे. मात्र, खाकी वर्दीचा धाक आता गावावर राहणार असून गावातील घडामोडी लागलीच पोलिसांना कळणार आहेत. दारू वाहतूक, अमली पदार्थ याबाबत गाव पोलीस गुप्त माहिती तयार करून अधिकाऱयांना देणार आहेत.

पोलीस पाटलांचे काय?

सध्या प्रत्येक गावात पोलीस पाटील नियुक्त असतोच. त्यात आता पुन्हा पोलिसांवर प्रत्येक गावाचा भार देण्यामागे काय हेतू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आधीच पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच त्यांच्यावर कामाचा भार आहे. मग ही अतिरिक्त जबाबदारी देण्याची गरज काय? शासनाचा पोलीस पाटलांवर विश्वास नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related posts: