|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिका कोणाची, आज फैसला

महापालिका कोणाची, आज फैसला 

प्रतिनिधी /सांगली :

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी 62.17 टक्के मतदान झाले. याची मतमोजणी आज होत आहे. येथील मिरज रोडवरील सेंटर वेअर हाऊसमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून पहिला निकाल साडे अकरापर्यंत लागण्याची शक्यता आहे. महापालिकेची सत्ता कोणाची याचा फैसला दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपामध्येच काटय़ाची टक्कर झाली आहे. आघाडी आणि भाजपा नेत्यांनी आमचीच सत्ता येणार असा दावा केला आहे.

महापालिकेसाठी काँग्रेस आघाडी 74, भाजपा 78, शिवसेना 51, अपक्ष विकास महाआघाडी 35, स्वाभिमानी विकास आघाडी 20, सुधार समिती 21 आणि एमआयएम 8, यांच्यासह अन्य मिळून एकूण 78 जागांसाठी 451 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणीच्या एकूण अकरा फेऱया होणार आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे सहा प्रभागांची मोजणी केली जाणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाने फेरीचा निकाल येणार असून तीनपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची संपूर्ण तयारी केली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. तर भाजपा आणि शिवसेना स्बळावर लढत आहे. सुधार समिती, एमआयएम, अपक्ष महाआघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. असे असले तरी खरी लढत काँग्रेस आघाडी आणि भाजपातच होणार आहे. कोणाच्या किती जागा येतात आणि कोणता पक्ष सत्तेवर येतो याकडे जिल्हय़ासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मोदी लाटेत केंद्र आणि राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेल्या दोन्ही काँग्रेससाठी ही निवडणूक म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय दिशा ठरविणारी आहे. तर वरून खालीपर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपासाठीही ही निवडणूक अत्यंत महत्वाची मनपाच्या इतिहासात प्रथमच झेंडा फडकविण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे.