|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माणमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे पाणीसाठे कोरडेच

माणमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे पाणीसाठे कोरडेच 

वार्ताहर / म्हसवड :

माण तालुक्याचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी गेल्या दोन वर्षात प्रयत्न झाले. मात्र त्या पटीत पावसाचे प्रमाण घटल्याने यंदाही तालुक्यातील बहुतांशी पाणीसाठे अद्याप कोरडेच आहेत.

माण तालुक्याच्या भौगोलिक व नैसर्गिक रचनेमुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याचे पाहायला मिळते. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 450 मिलिमीटर आहे. परंतु अनेकदा त्याहून खूपच कमी पाऊस पडतो. परिणामी दुष्काळी परिस्तिथी निर्माण होत असते. या दुष्काळाच्या काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे तलावातील पाण्याचा चांगला उपयोग होतो.

तालुक्यात पाटबंधारे विभागाचे दहा तलाव आहेत. त्यातील माण नदीवरील आंधळी तलावात सर्वाधिक 9.28 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊ शकतो. राणंद व पिंगळी हे तलाव ब्रिटिशकालीन आहेत. गेल्या वर्षी पडलेल्या पावसाने ऑगस्टच्या दरम्यान तालुक्यातील बाहुतांशी पाणीसाठय़ासह सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु यंदा तालुक्यात झालेल्या जलसंधारण कामामुळे उन्हाळी पावसाचे पाणी ज्या त्या भागात अडवले गेले. त्यातच यंदा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने राणंद तलाव वगळता इतर तलाव कोरडेच आहेत. उरमोडी प्रकल्पातून पाणी सोडल्याने ढाकणी तलावातही काही प्रमाणात पाणी साठले आहे.

गेल्या काही दिवसात जिह्यात सर्वत्र पावसाने चांगला जोर लावला आहे. परंतु माणमध्ये मात्र अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील टाळवमधील 31.46 दशलक्ष घनमीटर पाणीसाठय़ापैकी केवळ दोन तलावात मिळून अवघा 2.38 पाणीसाठा उरला आहे.

Related posts: