|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कारभार लवकर सुधारा, अन्यथा आंदोलन छेडू!

कारभार लवकर सुधारा, अन्यथा आंदोलन छेडू! 

प्रतिनिधी /मेढा :

जावली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत गाडे व अमोल तावरे यांना व्यसनमुक्त युवक संघाच्यावतीने आज निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विलासबाबा जवळ यांनी महावितणचा कारभार सुधारा, अन्यथा मेढा येथील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करू व जावलीकरांच्यावतीने असहकार करून लाईट बिले भरली जाणार नाहीत.

लोकांची कामे खोळंबली

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या लोकांची कामे खोळंबली जात असून ऑनलाईन सर्वच सेवा बंद पडत आहेत आणि याला जबाबदार वीज वितरण कंपनी असून वारंवार खंडीत होणाऱय वीज पुरवठय़ामुळे जनता त्रस्त झाली आहे. यावर आपण गांभीर्यपूर्वक तातडीने पाऊले उचलावीत.

जावली तालुक्यातील वीज वितरणच्या ग्राहकांची दुसरी गंभीर समस्या म्हणजे दुपटीने वाढवून येणारी वीज बिले. वारंवार वीज पुरवठा खंडीत होवूनही मे महिन्यापासून वीज बिलात दुपटीने वाढ झाली आहे. यामागे विजवितरण कंपनीचे अधिकारी व ठेकेदारांचे नेमके काय साटेलोटे आहे ते जाहीर करावे. अनेक वेळा हे ठेकेदार रिडींग घेत नाहीत व अंदाजे बिले दिली जातात, याला जबाबदार कोण?

तातडीने उपाय आवश्यक

या सर्व गंभीर समस्यांवर तातडीने उपाय योजना करावी, अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून वीज बिलांची होळी करून बिल न भरण्याची असहकार चळवळ जावलीकर उभारतील असा इशारा देण्यात आला.

यावेळी अरूण जवळ, अजित धनावडे, अक्षय करंजेकर, श्रीकांत जवळ, किरण धनावडे, सचिन केसकर उपस्थित होते. ग्राहक या ठिकाणी वाढीव बिलांची तक्रार घेवून आले होते. म्हणजे ही जावलीकरांसमोर केवढी गंभीर समस्या आहे याचा गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा. अशी मागणी यामाध्यमातून करण्यात आली आहे.

Related posts: