|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नव्या हंगामाच्या प्रारंभाला कोळंबी, पापलेटचा जोर

नव्या हंगामाच्या प्रारंभाला कोळंबी, पापलेटचा जोर 

जयगड बंदर मासेमारीने गजबजले,

मच्छिमारांमध्ये उत्साह

वार्ताहर /तवसाळ

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जयगड बंदर मच्छिमारांनी गजबजले. पहिल्याच दिवशी एकदिवसीय मासेमारी करणाऱया बोटींना कोळंबीं व पापलेट मोठय़ा प्रमाणावर मिळाल्याने मच्छिमारांमध्ये आनंद आहे. त्यामुळे आठवडाभरासाठी समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱया बोटींची पूर्वतयारी सुरु झाली आहे.

1 जून ते 31 जुलै हा मच्छीमारी बंदीचा कालावधी संपल्याने 1 ऑगस्टपासून एक दिवसासाठी मासेमारी करणाऱया बोटींनी मासेमारीसाठी सुरुवात केली आहे. बंदी कालावधीत जयगड बंदरावर सन्नाटा पसरल्याचे दिसून आले होते. मात्र आता हे बंदर मच्छिमारांनी गजबजले असून जांभारी, कुडली, चिंचबंदर, पडवे, हेदवतड, साखरीआगर, वेळणेश्वर, बोऱया, कारुळ, पालशेत आदी भागातील बोटींनी मर्यादित भागात जाऊन मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्याच दिवशी कोळंबी व पापलेट मासे मोठय़ा प्रमाणात जाळ्य़ात मिळाल्याने मच्छिमारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पूर्वी नारळीपौर्णिमेनंतरच खऱया अर्थाने मासेमारीला सुरुवात व्हायची. शासन निर्णयानुसार यंदा 22 दिवस अगोदरच ही मासेमारी सुरु झाली आहे. मात्र आठवडाभरासाठी मासेमारी करणाऱया बोटींनी थोडय़ा विलंबनानेच समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शासनाने 1 जूनऐवजी 10 ते 15 जूनपासून बंदी करुन नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारीसाठी परवानगी दिल्यास निसर्गाचा मान राखल्यासारखाच होईल, असेही मत मच्छिमारांनी व्यक्त केले आहे.