|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजाणी करा

हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजाणी करा 

प्रतिनिधी/ फोंडा

 डोंगर कापून बेकायदेशीररित्या भूखंड विकसित करण्यात आलेली मंगेशी कुंकळय़े येथील जागा खासगी वनक्षेत्र म्हणून सीमा आरक्षित करावी. राष्ट्रीय हरित लवादाच्या या आदेशाची अंमलबजाणी होत नसल्याने ग्रामस्थांतर्फे फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालय व वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या बेकायदेशीर भूखंड विरोधात लढा देण्यासाठी स्थापन केलेल्या वेलिंग प्रियोळ कुंकळय़े नागरिक कृती समितीच्या बॅनरखाली काल बुधवारी सकाळी हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते ऍड. राजू मंगेशकर यांनी केले. ग्रामस्थांसोबत पंचसदस्य दामोदर नाईक, लक्ष्मीकांत खेडेकर, संजना गावडे व हर्षा गावडे तसेच रामकृष्ण जल्मी व इतर पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. मंगेशी कुंकळय़े येथील सर्व्हे क्रमांक 236, 237, 238 व 239 या जागेत डोंगर कापून साधारण 1 लाख 20 हजार चौ. मीटर जागा भूखंडासाठी विकसित करण्यात आली आहे. त्याविरोधात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थांनी लढा उभारलेला आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणी न्यायालय व हरित लवादाकडे दाद मागितली होती. राष्ट्रीय हरित लवादाने (पुणे विभाग) हल्लीच या प्रकरणी निकाल देताना सदर जागा खासगी वनक्षेत्र म्हणून सीमा आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. मात्र वनखाते व संबंधित खात्यांनी या बाबत प्रक्रिया सुरु केलेली नाही. सरकारला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा बुधवारी हा मोर्चा काढून फोंडा उपजिल्हा कार्यालय व वनखात्याच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

कुठलेच बांधकाम होऊ देणार नाही

यावेळी बोलताना ऍड. मंगेशकर म्हणाले, कायदा व नियमांचे उल्लंघन करून व मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल करून ही जागा बेकायदेशीरित्या विकसित करण्यात आली आहे. साधारण 110 भूखंडांचे सेल डीडही झालेले आहे. मात्र कुठल्याच परिस्थितीत याठिकाणी बांधकाम होऊ देणार नाही. ज्या लोकांनी भूखंड विकत घेतलेले आहे, त्यांनी तेथे झाडे लावावी. कुठल्याच प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. गोव्यात स्थायिक झालेल्या काही परप्रांतीयांकडून याठिकाणी मंदिर उभारण्याचा प्रयत्न चालला आहे. हा प्रयत्नही हाणून पाडू असे त्यांनी सांगितले. स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांच्याशीही याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन वनखाते व सरकारच्या निष्क्रियतेबद्दल जोरदार घोषणा दिल्या. वनखात्याने याप्रकरणी वन्य सीमा आरक्षित न केल्यास वनखात्याला न्यायालयात खेचण्याचा इशाराही देण्यात आला.

वनक्षेत्र सीमा आरक्षण प्रक्रिया सुरु करणार : कुलदीप शर्मा

उपजिल्हाधिकारी कार्यालय, उत्तर गोव्याचे उपवनपाल कुलदीप शर्मा व कार्यनियोजन विभागाच्या उपवनपाल दीप शिखा शर्मा यांनाही ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. कुलदीप शर्मा यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना आपण या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून वन सीमा आरक्षण प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करू असे आश्वासन दिले. हरित लवादाने याप्रकरणी आदेश दिला असला तरी थॉमस समिती रद्द केल्याने नवीन समिती स्थापन करून या जागेचे फेरसर्वेक्षण करावे लागेल. लवकरच नवीन समिती स्थापन करून प्रक्रिया सुरु करताना या जागेत कुठलेच बांधकाम होणार नाही अशी हमी कुलदीप शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिली.

Related posts: